सारस्वतांच्या वास्तूत शनिवारी असंस्कृततेचे दर्शन;मसापच्या सर्वसाधारण सभेत निषेध करणाऱ्या सदस्याला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 20:29 IST2025-09-27T20:28:47+5:302025-09-27T20:29:13+5:30
मसापची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पाडली. सभेत एकूण सदस्य संख्या जवळपास ७५ ते ८० च्या आसपास होती.

सारस्वतांच्या वास्तूत शनिवारी असंस्कृततेचे दर्शन;मसापच्या सर्वसाधारण सभेत निषेध करणाऱ्या सदस्याला धक्काबुक्की
पुणे : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या सारस्वतांच्या वास्तूत शनिवारी असंस्कृततेचे दर्शन घडले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हातात ‘सत्य जरी एकला - असत्याला पुरून उरला, तसेच मसापचे पवित्र मंदिर, नाही कुणाची खासगी जाहगीर’, अशा आशयाचे घोषणा फलक घेऊन निषेध नोंदवण्यासाठी सभागृहात आलेल्या आजीव सदस्याला धक्काबुक्की करीत सभागृहाबाहेर काढण्यात आले. यामुळे मसाप काही विशिष्ट सदस्यांची मक्तेदारी झाली आहे का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मसापची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पाडली. सभेत एकूण सदस्य संख्या जवळपास ७५ ते ८० च्या आसपास होती. त्यातील ४५ सदस्य हे केवळ मसापच्या शाहूपुरी शाखेचे होते. प्रकृती अस्वस्थतेमुळे उपस्थित राहू न शकलेल्या डाॅ. रावसाहेब कसबे यांच्याऐवजी उपाध्यक्ष डाॅ. तानाजीराव चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. त्यामध्ये हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सभेस उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल असताना त्यांना अशी सभा घेण्यापासून रोखण्याची मागणी राजकुमार धुरगुडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. मात्र, तरीही सभा सुरू असल्याचे समजताच निषेध नोंदविण्यासाठी आलेल्या धुरगुडे यांना काही सदस्यांनी धक्काबुक्की केली. धुरगुडे हे फलक घेऊन डाॅ. कदम यांचे मनोगत सुरू असताना, सभागृहात आले. मात्र, काही सभासदांनी त्यांच्या कृतीला आक्षेप घेऊन सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्यातच एका पदाधिकाऱ्याने व्यासपीठावरून येत हस्तक्षेप केल्यानंतर काहीजण धुरगुडे यांच्या अंगावर गेले आणि त्यांना धक्काबुक्की केली. धुरगुडे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर उर्वरित सभा पार पडली. परिषदेचे आजीव सभासद असलेले धुरगुडे एकटे आले असते तर, त्यांना सभागृहात घेतले असते. मात्र, त्यांच्यासमवेत आलेले परिषदेचे सभासद नसल्याने त्यांना बाहेर काढावे लागले, असे स्पष्टीकरण परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी दिले.
वार्षिक सभेत नैमत्तिक विषय संमत झाल्यानंतर विनाेद कुलकर्णी यांनी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २२ डिसेंबरपासून सुरू होणारी प्रक्रिया निवडणूक झालीच, तर १५ मार्च रोजी नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईल. ५ फेब्रुवारी रोजी मतपत्रिका पाठविण्यात येणार असून, १३ मार्चपर्यंत आलेल्या मतपत्रिका ग्राह्य धरल्या जातील. ॲड. प्रताप परदेशी यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना संजीव खडके, प्रभा साेनवणे आणि गिरीश केमकर हे सहाय्य करणार आहेत, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
नव्या घटनेनुसार होणार निवडणूक
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेत काही महिन्यांपूर्वीच घटनेत बदल करण्यात आला आहे. नव्या घटनेनुसार मसापची पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याचे मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी सांगितले. नव्या घटनेनुसार आता पंचाहत्तरी पार व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभे राहता येणार नाही. साहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिकाला अध्यक्षपदाचा बहुमान दिला जात असे. कार्याध्यक्ष हे दैनंदिन कामकाजाचे प्रमुख असत. मात्र, नव्या घटनेनुसार कार्याध्यक्ष पद गोठविण्यात आले असून, कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष ही तीन पदे प्रमुख असणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद हुकूमशाही पद्धतीने चालणार नाही. निवडणूक घेण्याची मागणी करणारे आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र साहित्य परिषदेवर प्रशासक नियुक्त करा, अशी मागणी करू लागले आहेत. अशा साहित्यबाह्य शक्तींचा डाव उधळून लावला पाहिजे. - प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
‘मला लोकशाही माध्यमातून निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे. मात्र, मसापच्या बेकायदेशीर गटाने तो अधिकार हिरावून घेतला आहे, या अनधिकृत गटाकडून मला ही अपेक्षा होतीच. कारण जे लोक असंविधानिक पद्धतीने या संस्थेचा ताबा घेऊन जबरदस्तीने कारभार चालवत आहेत. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा माझी नव्हती. - राजकुमार धुरगुडे पाटील, आजीव सदस्य, मसाप
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनधिकृत कार्यकारिणीने घेतलेल्या अनधिकृत वार्षिक सभेत केलेली निवडणुकीची घोषणा ही घटनाविरोधी कृती आहे. त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमून त्याच्या नियंत्रणाखाली पारदर्शक पद्धतीने निवडणूक व्हावी, यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. - धनंजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती