मारुंजीत पीएमआरडीएकडून चारमजली अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:33 IST2018-04-04T20:31:22+5:302018-04-04T20:33:25+5:30
३ व ४ एप्रिल २०१८ रोजी सलग दोन दिवस अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत सुरु होती.

मारुंजीत पीएमआरडीएकडून चारमजली अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
पुणे : मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कारवाई केली. या कारवाईमध्ये चारमजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. मारुंजी येथील सर्व्हे नंबर ४५ मधील गंगाराम विश्नोई व जितेंद्र रजपूत यांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (1) अन्वये त्यांना नोटीसा पीएमआरडीएच्या वतीने देण्यात आल्या होत्या. मात्र, नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. या बांधकामाचे क्षेत्रफळ हे एकूण ९२०.१६ चौरस मीटर आरसीसी स्वरुपात चारमजली होते. या अनधिकृत बांधकामाचा निवासी व व्यावसायिक जागेसाठी वापर केला जात होता. ३ व ४ एप्रिल २०१८ रोजी सलग दोन दिवस अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत सुरु होती. धोकादायक पद्धतीने या अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या कारवाईवेळी पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, अनधिकृत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तथा प्रभारी उपअभियंता श्रीधर फणसे, साहायक अभियंता एम. आय. शेख तसेच हिंजवडी पोलीस स्टेशनच्या स्थानिक पोलीस बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली.
.................
पीएमआरडीएच्या हद्दीत अनेक ठिकाणी खासगी विकसकाकडून नागरिकांना वेगवेगळी आमिष दाखवून व्यवहारासाठी उद्युक्त केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या सदनिका खरेदी करताना पूर्ण माहिती घेऊन खरेदी करावीत. अनधिकृत सदनिका या स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात, याकरिता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. या सदनिकांची शहानिशा करूनच मगर व्यवहार करावे.
किरण गित्ते, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)