Pune: गाण्याचा आवाज बंद करण्यास सांगितल्याने २ महिलांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
By नम्रता फडणीस | Updated: December 12, 2023 17:05 IST2023-12-12T17:04:41+5:302023-12-12T17:05:33+5:30
ही घटना १० डिसेम्बर रोजी रात्री १० वाजता विमाननगर परिसरातील आर्यननगर भागात घडली...

Pune: गाण्याचा आवाज बंद करण्यास सांगितल्याने २ महिलांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : रस्त्यावर थांबलेल्या कारमधील गाण्याचा आवाज बंद करण्यास सांगणे दोन महिलांना महागात पडले. रस्ता काय तुमच्या बापाचा नाही असे म्हणत दोघींना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघा भावांविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० डिसेम्बर रोजी रात्री १० वाजता विमाननगर परिसरातील आर्यननगर भागात घडली.
आशुतोष विजय साबळे (वय २५), आदित्य विजय साबळे (वय २७) आणि आशिष विजयसाबळे ( वय २३ रा.सर्व गंगापूरम सोसायटी विमाननगर) याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय घरामध्ये झोपले होते. रस्त्यावर कारमध्ये जोरात गाणे लावून तिघे भाऊ थांबले होते. फिर्यादी यांनी त्यांना हटकले. गाण्याचा आवाज बंद करण्याचा राग आल्याने रस्ता काय तुमच्या बापाचा आहे असे आरोपींनी म्हटल्याने फिर्यादी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली.
तसेच फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादी
यांच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील गहाण झाले आहे. त्यानुसार तिघांवर भादंवि ३५४,३२३,५०४ आणि ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस.के पोटे पुढील तपास करीत आहेत.