येरवडा तुरुंगातील हायप्रोफाईल आरोपीला परस्पर घरी नेणारे दोन पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 20:44 IST2018-11-07T20:42:31+5:302018-11-07T20:44:09+5:30
फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला न्यायलयीन कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने परस्पर घरी घेऊन जाणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले.

येरवडा तुरुंगातील हायप्रोफाईल आरोपीला परस्पर घरी नेणारे दोन पोलीस निलंबित
पुणे : फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला न्यायलयीन कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने परस्पर घरी घेऊन जाणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले. या दोघा पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त स्वप्ना एच. गोरे यांनी त्यांच्या निलंबनाबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पोलिस नाईक नामदेव दादाभाऊ डगळे आणि कमलेश बाळासाहेब पाटील (दगाबाज) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ते दोघेही पोलिस मुख्यालयातील कोर्ट कंपनीत नेमणुकीस आहेत. हा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी घडला होता. डगळे आणि पाटील यांना ३ नोव्हेंबर रोजी येरवडा कारागृहातून आरोपीला बाहेर काढून न्यायालयात हजर करण्याबाबतचा आदेश देण्यात आला होता. मागणीपत्रात केवळ एकाच आरोपीचा उलेख करण्यात आला होता. त्यांना केवळ एका आरोपीला येरवडा जेलमधून बाहेर आणण्यास नेमले असताना त्यांनी येरवडा जेलमधून विशाल शिंदे आणि दीपक पाटील यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने कामकाज संपल्यानंतर त्यांनी विशाल शिंदे याला कोर्ट लॉकअप येथे जमा केले आणि पोलिस कर्मचारी विखे यांना वॉरंट नोंद करण्याकामी कोर्ट लॉकअप येथे पाठविले. दीपक पाटील यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांची भेट घ्यायची होती़ त्यासाठी पोलिस नाईक डगळे आणि पोलिस कर्मचारी पाटील यांनी दीपक पाटील यांना खाजगी मोटारीतून कोथरूड परिसरातील करिष्मा हाऊसिंग सोसायटीत आणले़ ही मोटार दीपक पाटील यांचा मुलगा चालवित होता.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला परस्पर घरी नेल्याची माहिती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनी अलंकार पोलिसांना त्याची माहिती दिली.
दरम्यान, याबाबतची माहिती शहर नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. अलंकार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यांनी पोलिस ठाण्यातील मार्शल डयुटीवर असलेल्या पोलिसांना करिष्मा सोसायटीमध्ये पाठविले. त्यावेळी पोलिस नाईक डगळे आणि पोलिस कर्मचारी पाटील हे आरोपी दीपक पाटील यांच्यासह तेथे आढळून आले. त्यांना अलंकार पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दीपक पाटील याच्याविरूध्द चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
पोलिस नाईक डगळे आणि पोलिस नाईक पाटील यांनी केलेले हे कृत्य पोलिस खात्यास शोभनीय नसल्याने तसेच त्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करुन कर्तव्यामध्ये कसूर करून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.