पैसे द्या, असे सांगून २० हजार रुपये मागितले;नागरिकांना लुबाडणारे दोन पोलिस अंमलदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 20:10 IST2025-06-21T20:09:13+5:302025-06-21T20:10:31+5:30

पुणे : नागरिकांच्या मदतीसाठी कमी वेळेत पोहोचता यावे यासाठी पोलिस ठाणे स्तरावर मोबाईल व्हॅन देण्यात येतात. या व्हॅनद्वारे हद्दीत ...

Two police officers suspended for robbing citizens, demanding Rs 20,000 | पैसे द्या, असे सांगून २० हजार रुपये मागितले;नागरिकांना लुबाडणारे दोन पोलिस अंमलदार निलंबित

पैसे द्या, असे सांगून २० हजार रुपये मागितले;नागरिकांना लुबाडणारे दोन पोलिस अंमलदार निलंबित

पुणे : नागरिकांच्या मदतीसाठी कमी वेळेत पोहोचता यावे यासाठी पोलिस ठाणे स्तरावर मोबाईल व्हॅन देण्यात येतात. या व्हॅनद्वारे हद्दीत गस्त घालून गुन्ह्यांना आळा घालावा, असा यामागचा हेतू असतो. पण, मोबाईल व्हॅनवर नेमलेले पोलिस कर्मचारीच रात्री लोकांना अटक करण्याची धमकी देऊन, लोकांच्या तक्रारी असल्याचे खोटे सांगून लुबाडत असल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांचे निलंबन केले.

गणेश तात्यासो देसाई आणि योगेश नारायण सुतार अशी या निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गणेश देसाई याला १७ जून रोजी रात्रपाळीसाठी मोबाईल व्हॅनवर चालक म्हणून तर, योगेश सुतार याला बालगंधर्व बीट मार्शल म्हणून नेमणूक दिली होती. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात एका तक्रार अर्ज आला. त्या अर्जाच्या चौकशीनंतर ही कारवाई झाली.

त्या अर्जात संबंधित तक्रारदार व त्यांची मैत्रीण हे लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ येथील गल्लीत कार उभी करुन थांबले होते. त्यावेळी दोन पोलिस अंमलदार आले व त्यांनी या भागातून एक तक्रार आली असून, पैसे द्या, असे सांगून २० हजार रुपये मागितले. एवढे पैसे का?, असे विचारले असता त्यांना चौकीला चला असे बोलले. पोलिस अन् चौकी या गोष्टीचे दडपण येऊन चौकीला नको, असे म्हणून त्यांनी पैसे देण्याचे कबूल केले. त्यानंतर गणेश देसाई याच्या दुचाकीवर मागे बसून कमला नेहरू पार्क येथील एटीएममधून २० हजार रुपये काढून दिले होते. जर संबंधिताकडून कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाणे आवश्यक असताना कोणतीही कार्यवाही न करता त्यांना सोडून देऊन कर्तव्यात कसूर करुन बेजबाबदारपणाचे वर्तन करुन पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्या दोघांना पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबित केले आहे. यापूर्वी देखील बाणेर येथील एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बाणेरमधील बीट मार्शलने पैसे घेऊन लुबाडल्याची घटना उघडकीस आली होती.

Web Title: Two police officers suspended for robbing citizens, demanding Rs 20,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.