पिंपरी :कारला धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून मारहाण करत दोघांचे आळंदी रोड भोसरी येथून अपहरण केले. दोघांकडून जबरदस्तीने ऑनलाइन माध्यमातून पैसे घेत त्यांना चाकण परिसरात सोडून दिले. ही घटना सोमवारी (दि. २) घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.विनोद दिलीप सोनवणे (३३, रा. भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह नितीन गराडे आणि त्याचा मित्र सोन्या या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विशाल शाहुराज दुधभाते (२५, रा. हडपसर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यांच्या गाडीचा संशयितांच्या गाडीला धक्का लागला. त्या कारणावरून संशयितांनी विशाल आणि त्यांचे नातेवाईक शिवाजी लक्ष्मण काळे यांना ‘आम्हाला नुकसानभरपाईचे पैसे दे. नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली.विशाल आणि शिवाजी यांचे मोबाइल फोन जबरदस्तीने काढून घेतले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. दोघांना मोशी चाकण परिसरामध्ये नेऊन त्यांच्या खिशातून तीनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मोबाइलमधील फोन पेद्वारे दहा हजार रुपये संशयितांनी त्यांच्या मोबाइलमधील स्कॅनरवर स्कॅन करून जबरदस्तीने पाठविण्यास सांगितले.
कारला धक्का लागल्याने केले थेट दोघांचे अपहरण; नुकसानभरपाईसाठी जबरदस्तीने घेतले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:13 IST