धनकवडी : मोबाईल गेम खेळताना दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी आणि वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्रा वर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला, हि घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सिंहगड कॉलेज परिसरात गुरुवारी (दि.१५) रात्री दहाच्या सुमारास घटली.गोळीबार करणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बब्या उर्फ निलेश जाधव वय २१ वर्ष रा. दभाडी असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. करण गरजमल वय १९ वर्ष रा. दभाडी असे गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दोघेही मित्र सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईल वर गेम खेळत होते, गेम खेळत असताना, दोघांमध्ये सुरुवातीला चेष्टा मस्करी झाली आणि त्यानंतर वाद झाला, यामध्ये बब्या उर्फ निलेश ने गावठी कट्ट्यातून करण वर गोळी झाडली, हि गोळी निलेश च्या खांद्यावर लागली, जखमी निलेश वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयांने खबर दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी जाधव ला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.