पुणे : रिक्षा घेण्यासाठी अॅडव्हान्स पैसे दिले असतानाही त्याबाबत काहीही सांगत नसल्याच्या वादातून दुसऱ्या मजल्यावरुन दोघा भावांना ढकलून दिले़. त्यात एक जणही गंभीर जखमी झाला आहे़. ही घटना ससाणेनगर येथील शांती बिल्डिंगमध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडली़. नामदेव पंढरी मुंगरे (वय ३८, रा़ शांती बिल्डिंग ससाणेनगर, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे़. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन गोविंद हनुमंत घोडके (वय २१, रा़ चौधरीनगर, लातूर) याला अटक केली आहे़. याप्रकरणी बालाजी पंढरी मुंगरे (वय ३६, रा़. सिद्धार्थनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बालाजी आणि नामदेव मुंगरे हे भाऊ भाऊ आहेत. नामदेव मुंगरे हे रिक्षाचालक आहेत. गोविंद घोडके याने रिक्षा विकत घेण्यासाठी नामदेव याला १५ हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते़. तरीही त्याने रिक्षा दिली नाही़. त्यामुळे गोविंंद घोडे हा शुक्रवारी सकाळी नामदेव राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आला होता. त्यावेळी घोडके याने रिक्षा कधी देणार अशी विचारणा नामदेवकडे केली़. तेव्हा नामदेव याने मला सारखे रिक्षा कधी देणार, असे विचारुन नको, मला होईल तेव्हा देईल, असे उत्तर दिले़. नामदेव याचे उत्तर ऐकल्यावर घोडके याला त्याचा राग आला़. त्यावरुन त्यांचा वाद सुरु होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले़. दोघेही मारहाण करत वऱ्हांडात आले़. बालाजी मुंगरे हे दोघांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले़. तेव्हा घोडके याने दोघांना दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले़. दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली पडल्याने नामदेव मुंगरे हे जखमी झाले़. बालाजी हे समोरच्या वायरवर पडल्यानंतर ते जमिनीवर पडल्याने त्यांना लागले नाही़. जीवे मारण्याच्या उद्देशाने दुसऱ्या मजल्यावरुन टाकल्याने पोलिसांनी घोडके विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.
रिक्षा घेण्याच्या वादातून दोघा भावांना दुसऱ्या मजल्यावरुन फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 15:33 IST
रिक्षा घेण्यासाठी अॅडव्हान्स पैसे दिले असतानाही त्याबाबत काहीही सांगत नसल्याच्या वादातून दुसऱ्या मजल्यावरुन दोघा भावांना ढकलून दिले़.
रिक्षा घेण्याच्या वादातून दोघा भावांना दुसऱ्या मजल्यावरुन फेकले
ठळक मुद्देरिक्षाचालक भाऊ जखमी : एकाला अटक, हडपसरमधील घटना