मध्यरात्री डी. जे. बंद करण्यासाठी गेलेल्या पाेलिसांना धक्काबुक्की ; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:17 IST2018-12-18T15:13:14+5:302018-12-18T15:17:59+5:30
मध्यरात्रीपर्यंत डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी गेले असताना पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करुन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याची घटना घडली़.

मध्यरात्री डी. जे. बंद करण्यासाठी गेलेल्या पाेलिसांना धक्काबुक्की ; गुन्हा दाखल
पुणे : मध्यरात्रीपर्यंत डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी गेले असताना पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करुन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याची घटना घडली़. ही घटना खडकीतील शेवाळे टॉवर्स पाण्याची टाकीजवळ सोमवारी मध्यरात्री एक वाजता घडली़. खडकीपोलिसांनी दोघांना अटक केली असून एकावर गुन्हा दाखल केला आहे.
तन्वीर शेख (वय ४६, रा़ सुरती मोहल्ला, खडकी), सिद्धाराम तिपन्ना यळसंगी(वय ३०, रा़ दर्गा वसाहत, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे असून शैलेश गायकवाड (रा़ सुरती मोहल्ला, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस़ बी भोसले यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शेवाळे टॉवर्सजवळ सोमवारी मध्यरात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी तेथे मोठ्या आवाजात डी जे चालू होता. मध्यरात्री पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविण्यात आली. या तक्रारीनुसार बीट मार्शल तेथे गेले व त्यांनी स्पीकर बंद करायला सांगितले. परंतु, त्यांनी पोलिसांचे काही न ऐकता त्यांच्याशी वादावादी सुरु केली़ तेव्हा पोलीस उपनिरीक्षक एस़ बी़ भोसले तेथे गेले़ भोसले व त्यांच्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना तेथील लोकांनी धक्का बुक्की करुन स्पीकर बंद करण्यास विरोध केला. अश्लिल शिवीगाळ करुन पोलीस शिपाई म्हस्के यांना धक्का दिला. बीट मार्शल यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली. त्यामुळे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एच़ एस़ ठाकुर अधिक तपास करीत आहेत.