आवडीचे चॅनेल निवडलेल्या नागरिकांचे टीव्ही झाले बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 15:41 IST2019-02-02T15:39:54+5:302019-02-02T15:41:38+5:30
ज्या ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्या ग्राहकांचे टीव्ही सध्या बंद झाले असल्याचे चित्र आहे.

आवडीचे चॅनेल निवडलेल्या नागरिकांचे टीव्ही झाले बंद
पुणे : ट्रायच्या नियमानुसार 31 जानेवारी पर्यंत नागरिकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडायचे होते. नागरिकांना नको असलेलले चॅनेलचे पैसे सुद्धा भरावे लागत असल्याने आता चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य ट्रायकडून ग्राहकांना दिले आहे. त्यानुसार ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडायचे होते. परंतु ज्या ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्या ग्राहकांचे टीव्ही सध्या बंद झाले असल्याचे चित्र आहे.
ट्रायने चॅनेल निवडीचा अधिकार आता ग्राहकांना दिला आहे. जेवढे चॅनेल नागरिकांनी निवडले आहेत तेवढ्याच चॅनेलचे पैसे नागरिकांना भरायचे आहेत. 31 डिसेंम्बर पर्यंत चॅनेल निवडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्यातील काहींचे सर्वच चॅनेल बंद झाले आहेत. तर ज्यांनी अद्याप आवडीचे चॅनेल निवडले नाहीत त्यांचे टीव्ही त्यांच्या पूर्वीच्या पॅकनुसार सुरु आहेत. त्यामुळे आवडीचे चॅनेल नियमानुसार निवडल्यानंतरही टीव्ही बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातील काही नागरिकांनी कस्टमर केअर ला विचारणा केल्यानंतर पुढील 48 तास त्यांचे टीव्ही बंद राहतील. असे सांगण्यात आले.
याबाबत बोलताना ओंकार दीक्षित म्हणाले, ट्रायच्या नियमांनुसार मी माझ्या केबल चालकाशी संपर्क करून माझ्या आवडीचे चॅनेल निवडले. परंतु आज सकाळपासून माझे सर्वच चॅनेल बंद झाले आहेत. 48 तासात निवडलेले चॅनेल सुरु होतील असे केबल चालकाकडून सांगण्यात आले.
सिद्धार्थ गायकवाड म्हणाले, मी 31 तारखेच्या आधी माझ्या डिटीएच वर माझ्या आवडीचे चॅनेल निवडले. परंतु आज सकाळी अचानक सगळेच चॅनेल बंद झाले. याबाबत विचारणा केली असता. 48 तासात टीव्ही सुरु होईल असे सांगण्यात आले.