चंदननगर : नगर रोडवरील दर्गा चौक परिसरात सोमवारी मध्यरात्री हायवा ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. योगेश सत्यवान चौधरी (वय २५, रा. गणपती मंदिरामागे, खराडी गाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी हायवा ट्रकचालकास अटक केली आहे.
सोमवारी (दि.१०) रात्री बारा वाजेच्या सुमारास योगेश चौधरी हा तरुण दुचाकीवरून घरी जात होता. नगर रोडवरील दर्गा चौकाजवळ भरधाव हायवा ट्रकने (क्र. एमएच १२ वायबी १५३७) त्याला धडक दिली. यात योगेशचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच विमानतळ पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालक परमेश्वर काशीनाथ पवार (वय ३२, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. याप्रकरणी मृताचे नातेवाईक दौलत राजाराम चौधरी यांनी फिर्याद दिली. चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५ (निष्काळजीपणे मृत्यू घडवणे), कलम २८१ (धोकादायक वाहन चालवणे) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड पुढील तपास करत आहेत.