Pune Crime| पुणे शहरात कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले
By विवेक भुसे | Updated: September 27, 2022 11:09 IST2022-09-26T15:50:04+5:302022-09-27T11:09:03+5:30
दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे...

Pune Crime| पुणे शहरात कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले
पुणे : ट्रकचालकाला थांबवून त्याला कोयत्याचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. त्यांच्यातील एकाला हडपसरपोलिसांनी अटक केली आहे. दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नितिन सुनिल चव्हाण (वय २२, रा. भराडी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत राम सुदाम मोहाळे (वय २७, रा. खोकलेवाडी, परभणी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मोहाळे हे ट्रक घेऊन रविवारी मध्यरात्री मंतरवाडी रोडवरुन जात होते. त्यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी जबरदस्तीने ट्रक थांबविला. त्यांच्यातील दोघे ट्रकवर चढून फिर्यादी यांना मारहाण केली. एकाने कोयता बाहेर काढून तुझ्याकडे पैसे किती आहे ते सर्व पैसे व मोबाईल काढून देत़ नाही तर मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यांच्याकडील १० हजार रुपयांची रोकड व मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
ट्रकचालकाने दिलेल्या वर्णनानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे व त्यांचे सहकारी मंतरवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरुन तिघे जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. नितीन चव्हाण याच्याकडून पोलिसांनी कोयता व गाडी जप्त केली. न्यायालयाने त्याला २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.