धनकवडी : आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरी पुलाजवळ शुक्रवार (दि.१३) पहाटे भीषण अपघात झाला. साताऱ्याकडून मुंबईकडे जात असलेल्या ट्रकचे ब्रेक निकामी होऊन तो वाहनावर धडकला. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून, मदतनीस किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातात नासिर मोहम्मद शाह मोहम्मद चौधरी ( ३६) यांचा मृत्यू झाला, तर मदतनीस अर्जुन दीपक मौर्य (२८, दोघे रा. कुदळवाडी, चिखली, मूळ उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक (एमएच १४ एचजी ९८०३) साताऱ्याकडून मुंबईकडे जात असताना दरीपुलाच्या अगोदर अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो वाहनावर आदळला. यात ट्रकचालक जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने नऱ्हे येथील सिल्वर बर्च हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी ट्रकचालकाला तपासून मृत घोषित केले. या अपघातानंतर काहीकाळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
Web Summary : Near Dari Bridge, Ambegaon, a truck driver died after brake failure caused a crash. The driver, Nasir Choudhary, died and his assistant was injured. Police are investigating.
Web Summary : आंबेगांव के पास दरी पुल पर ब्रेक फेल होने से ट्रक दुर्घटनाग्रस्त, चालक नासिर चौधरी की मौत, सहायक घायल। पुलिस मामले की जांच कर रही है।