मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात ट्रक आणि प्रवासी बसचा अपघात; अकरा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:24 IST2022-11-14T16:22:29+5:302022-11-14T16:24:24+5:30
या अपघातात तीनजण गंभीर जखमी तर आठजण किरकोळ जखमी झाले आहेत...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात ट्रक आणि प्रवासी बसचा अपघात; अकरा जण जखमी
लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील किमी ४१ जवळ रविवारी रात्री नऊच्या सुमारास ट्रक व प्रवासी बस यांच्यात अपघात झाला. यामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले तर आठजण किरकोळ जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक क्र. एमएच ४०-बीजी ३४५७ चा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक रस्ता दुभाजक ओलांडत मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेली प्रवासी बस क्रमांक (केए ४१ डी १४७१) वर आदळत पलटी झाल्याने हा अपघात झाला.
या अपघातात बसची उजवी बाजू पूर्णतः चक्काचूर झाली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत बस शोल्डर लेनवर घेतल्याने मोठी हानी टळली असली तरी, या अपघातामध्ये ट्रक चालक नावेद खान (नागपूर) व बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.