घरची लक्ष्मी बनली जमिनीची मालक; शेतीतही महिला अग्रेसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:28 IST2025-03-14T09:28:03+5:302025-03-14T09:28:14+5:30
दहा वर्षांत बदलली स्थिती, कृषी गणनेतून स्थिती स्पष्ट

घरची लक्ष्मी बनली जमिनीची मालक; शेतीतही महिला अग्रेसर
नितीन चौधरी
पुणे : महिलांना मालमत्तेत सहभागी करून घेण्यासाठी राज्य सरकारने घराची तसेच जमिनीची मालकी महिलांच्या नावावर असल्यास अनेक योजनांमध्ये सवलती जाहीर केल्या आहेत. याचे प्रतिबिंब सध्या सुरू असलेल्या कृषी गणनेतही दिसून येत आहे. राज्यात २०१०-११ मध्ये झालेल्या कृषी गणनेत २० लाख महिलांकडे २५ लाख हेक्टर जमीन होती. त्यानंतरच्या दहा वर्षाच्या कालावधीत महिलांची संख्या तब्बल १५ लाखांनी वाढून त्यांच्याकडील एकूण क्षेत्रातही १५ लाख हेक्टरची वाढ झाली आहे. यातून कुटुंबांमध्ये लक्ष्मीच्या नावावर जमीन करण्याकडे ओढा दिसून येत आहे.
कोरोनामुळे २०२१-२२मध्ये न झालेली कृषी गणना २०२४-२५ या आर्थिक वर्षात पूर्ण केली जात आहे. या गणनेतून शेतीत पुरुषांइतकाच महिलांचा देखील सहभाग वाढत असल्याचे दिसून आले आहे.
१६.७३% पुरुष शेतकरी वाढले
-२.१२% पुरुषांच्या नावावरील शेती घटली
७१.३२% महिला शेतकरी वाढल्या
६०.३०% महिलांच्या नावावरील शेती वाढली
महिलांना मालमत्तेत घेण्यासाठी आणि त्यांना सहभागी करून समान हक्क देण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी