तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना ३ महिन्यांपासून पगार नाही; इतरांनी वर्गणी काढून फंड उभा करत दिला पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:54 IST2025-07-18T17:53:49+5:302025-07-18T17:54:04+5:30

तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना तीन महिने पगार न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते

Transgender security guards have not been paid for 3 months; other security guards have paid their salaries by raising funds through subscriptions | तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना ३ महिन्यांपासून पगार नाही; इतरांनी वर्गणी काढून फंड उभा करत दिला पगार

तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना ३ महिन्यांपासून पगार नाही; इतरांनी वर्गणी काढून फंड उभा करत दिला पगार

पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागामध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या १३ तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना गेली तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी वर्गणी काढून फंड उभा करत पगार न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना मदत केली.

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य केंद्र, दवाखाने, जलकेंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभूमी, मंडई, माध्यमिक शाळा, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प, उद्याने, वसतिगृह आदींसह विविध वास्तूंच्या ठिकाणी सुरक्षा पुरवण्यासाठी महापालिकेकडून खासगी ठेकेदार कंपनीमार्फत सुरक्षा रक्षक नेमले जातात. कंत्राटी पद्धतीने जवळपास १ हजार ६६० सुरक्षा रक्षक नेमले जातात.

दरम्यान, तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने ५० तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनी मार्फत पहिल्या टप्प्यात २५ तृतीयपंथीयांना कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देण्यात आली. महापालिका भवन, कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि ठोसर पागा स्मशानभूमी येथे या तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका केल्या आहे. हे सर्व सुरक्षारक्षक इमाने इतबारे काम करत आहेत. त्यांच्या कामाचा सुरक्षा विभागालाही फायदा होत आहे.

मात्र, हे सुरक्षा रक्षक ज्या ठेकेदार कंपनीमार्फत कामावर आहेत, त्या ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेसने पूर्वीचे नाव व आताचे नाव वेगळे आहे, हे कारण देत १३ तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांचा पगार गेली तीन महिन्यांपासून थांबवला आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेसचे काम गेले आहे, नवीन ठेकेदार कंपनीच्या निविदा मंजूर झाल्याने या सुरक्षा रक्षकांमध्ये थकलेला पगार मिळेल की नाही, याबद्दल भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या सुरक्षा रक्षकांचा पगार थकवल्याबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी ईगल कंपनीला नोटीस बजावली आहे.

ईगल कंपनीने १३ तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांचा पगार थकवल्याने त्याला नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे थकलेला पगार, इतर सुरक्षा रक्षकांचा ईएसआय, पीएफ, विविध कारणांनी कपात केलेला पगार आदी दिल्याशिवाय साडेचार कोटींचे बिल अदा केले जाणार नाही, असे कळवण्यात आले आहे. - राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका

फंडातून केली मदत 

तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना तीन महिने पगार न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते. ते राहत असलेल्या घराचे भाडे, औषधे व इतर अत्यावश्यक खर्चाची अडचण लक्षात घेऊन सुरक्षा विभागातील त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्गणी काढून ४० हजारांचा फंड जमा केला. या फंडाच्या माध्यमातून या १३ जणांना आर्थिक मदत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Transgender security guards have not been paid for 3 months; other security guards have paid their salaries by raising funds through subscriptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.