व्यवहार रद्द, आता वसतिगृह व मेस सुरू करावी; जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:54 IST2025-11-16T11:53:28+5:302025-11-16T11:54:39+5:30
बंद झालेले वसतिगृह आणि खानावळ लवकर सुरू करावी, अशी मागणी जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी व्यक्त केली.

व्यवहार रद्द, आता वसतिगृह व मेस सुरू करावी; जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांची अपेक्षा
पुणे : समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करून पाठिंबा दिला आणि शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जागेचा वादग्रस्त व्यवहार रद्द झाला. आता बंद झालेले वसतिगृह आणि खानावळ लवकर सुरू करावी, अशी मागणी जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी व्यक्त केली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे बेड, पंखे आणि लाईटस् गायब आहेत, याला ट्रस्टी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मॉडेल कॉलनी येथील सुमारे १२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या (तीन एकर) भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे. मात्र, ट्रस्टचे काही विश्वस्त, राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी संगनमत करून या जागेचा २३० कोटींचा व्यवहार केला. या विरोधात जैन समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून जागेचा वादग्रस्त व्यवहार येत्या पंधरा दिवसांत रद्द न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी दिला होता. अखेर न्यायालयाने हा व्यवहार रद्द करण्याचा आदेश दिला.
या पार्श्वभूमीवर आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, जागेचा लढा मोठा होता. या लढ्यात आम्हाला सर्वांनी सहकार्य केले. यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जोर लावला. शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मी केलेल्या आवाहनाला साथ दिली. मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळे जागेचा व्यवहार रद्द झाला आहे.
ट्रस्टींनी चुका केल्या आहेत, त्यांनी याचे प्रायश्चित्य करणे गरजेचे आहे. ट्रस्टींनी येथील वसतिगृह सुरू करण्याचे आश्वासन देऊन काम सुरू केले आहे. मात्र, वसतिगृहात लाईट नाही, विद्यार्थ्यांसाठीचे बेड, पंखे गायब आहेत. सुरक्षारक्षक असतानाही या वस्तू गायब झाल्या. संत निवास तोडण्यात आले आहे. ट्रस्टच्या नावे सात एकर जागा असताना जागेवर केवळ तीन एकरच आहे, मग उर्वरित जागा कुठे गेली. याचा शोध घेणे गरजेचे आहे. या सर्व प्रकारांना ट्रस्टीच जबाबदार आहेत. त्यामुळे सध्याचे ट्रस्टी बदलून नवीन ट्रस्टींची नेमणूक करावी, अशी मागणी आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी केली.
तोपर्यंत गोड पदार्थ खाणार नाही -
जैन बोर्डिंगमध्ये श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे. मात्र, या ठिकाणी असलेली भगवान महावीरांची मूर्ती लहान आहे. या ठिकाणी मोठी मूर्ती असणे अपेक्षित आहे. जोपर्यंत या ठिकाणी मोठी मूर्ती येत नाही, तोपर्यंत मी तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाणार नाही, असा निर्धार आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी यावेळी केला.
भोपाळमधील वैद्यकीय महाविद्यालय वाचविले पाहिजे -
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे जैन समाजाचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. तेथील ट्रस्टींच्या चुकीच्या कारभारामुळे ते महाविद्यालय अडचणीत आले आहे, ते विक्रीला काढले आहे. देशातील सर्व समाज बंधव, जैन मुनी आणि सरकारला विनंती आहे, ते महाविद्यालय वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, केवळ जैन नव्हे तर सर्व जाती धर्मांच्या संस्था वाचणे गरजेचे आहे, असेही आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी नमूद केले.
शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या नावे मॅडेल कॉलनी येथे सात एकर जागा होती, असे समोर आले आहे. प्रत्यक्षात केवळ तीन एकर जागा शिल्लक आहे. उर्वरित जागेचे काय झाले, याचा तपास आम्ही करणार आहोत. तसेच बंद वसतिगृह लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - अक्षय जैन, सदस्य, जैन बोर्डिंग बचाव कृती समिती.