रांजणगाव गणपती : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कोंढापुरी (ता. शिरुर) येथे एसटीच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी घडली. निवृत्ती सांडू मोकासे (वय ४६, रा. पिशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात एसटी चालक तुषार योगीराज बावीस्कर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर येथून आळंदीकडे गुरुवारी वारकऱ्यांची दिंडी निघालेली होती. या दिंडी सोबत निवृत्ती मोकासे व ज्ञानेश्वर शिंदे हे दोघे वारकरी ट्रॅक्टर सोबत असलेला पाण्याचा टँकर घेऊन दिंडी सोबत चालत होते. ट्रॅक्टरचा वेग कमी असल्याने हळूहळू येत होते. कोंढापुरीमध्ये टँकरच्या ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने निवृत्ती मोकासे रस्त्याचे कडेला थांबलेले असताना अहिल्यानगर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या बस (क्र. एमएच १४ एलएक्स ६४३७) ने निवृत्ती मोकासे यांना धडक दिली. त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मोकासे यांना मृत घोषित केले. याबाबत राजू सांडू मोकासे (रा. पिशोर, ता. कन्नड) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एसटी चालक तुषार योगीराज बावीसकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार अतुल पखाले हे करत आहे.