इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचे 'टोल बंद' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 06:41 PM2021-06-21T18:41:04+5:302021-06-21T18:45:36+5:30

बैल गाड्यांनी टोल नाका केला बंद ; मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करून शेतकरी वैतागले 

'Toll close' agitation of farmers by bullock carts on the Indapur toll plaza | इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचे 'टोल बंद' आंदोलन

इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचे 'टोल बंद' आंदोलन

googlenewsNext

इंदापूर: इंदापूर शहरालगतच्या पुणे - सोलापूर बाह्यवळण येथील बेडशिंग रोड ते पायल सर्कल पर्यंतच्या महामार्गावर सर्व्हिस रोड करण्यात यावा, या मागणीसाठी इंदापूर शेतकरी कृती समितीच्या वतीने इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांनी टोल नाका बंद करून आंदोलन करण्यात आले. 

याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्रकल्प संचालक, पुणे यांना इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक पोपट शिंदे व शेकडो शेतकऱ्यांनी सह्या करून मागील सात वर्षात अनेक वेळा निवेदन दिले. खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे दोन वेळा पत्र जोडून राजमार्ग प्राधिकरणास पाठपुरावा केला. तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने इंदापूर शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकारी यांना आत्मदहनाचे निवेदन देवून सोमवारी (दि. २१) सरडेवाडी टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन केले. 

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनेक बैलगाड्या सरडेवाडी टोल नाक्यावर आणल्या होत्या. बैल गाड्यांनी टोल नाका बंद करण्यात आला होता. आंदोलनात शेतकरी महिला, लहान मुले, अनेक शेतकरी कुटुंब व तरुण सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी टोल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

यावेळी आंदोलनाचे प्रमुख नगरसेवक पोपट शिंदेचे यांच्याशी इंदापूरचे तहसिलदार अनिल ठोंबरे, प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आंदोलन स्थळी संवाद साधला व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आंदोलनकांनी स्पष्ट विरोध केला. त्यांनंतर तहसिलदार यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री चिटणीस यांना इंदापूर तहसिल कार्यालयात आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे नगरसेवक पोपट शिंदे म्हणाले, सर्व्हिस रस्ता करण्याबाबत आम्ही मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत.आमच्या एकाही अर्जाची अद्यापपर्यंत टोल प्रशासनाने दखल घेतलेली नाही. अगर कोणत्याही अधिकाऱ्याने घटनास्थळावर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली नाही. या ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्यामुळे आम्हाला शेतमाल वाहून नेणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. तसेच अपघात होऊन दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. याला टोल प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप पोपट शिंदे यांनी केला. 

दोनच दिवसांत रस्त्याचा प्रस्ताव देणार 

आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणीस यांनी आंदोलकांची इंदापूर तहसिल कार्यालयात भेट घेतली. दोनच दिवसात कच्चा रस्ता करून प्रस्ताव दिल्ली, मुंबई व पुणे ऑफिसला पाठवणार असून, त्याची एक प्रत शेतकरी व तहसिलदार यांना पाठवणार आहे. तसेच लवकरच सर्व्हिस रोड तयार करून देणार असल्याचे सांगितले.
.....
 राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश

शेतकरी आंदोलन करणार आहेत याचे निवेदन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पोहचताच भरणे यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. पुणे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून आदेश दिला. शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी राजमार्ग प्राधिकरणाचे संचालक यांनी धाव घेतली व सात वर्षे शेतकऱ्यांनी ज्यासाठी संघर्ष केला ते काम राज्यमंत्री भरणे यांच्या मध्यस्थीने सात तासांत झाले. 
......

Web Title: 'Toll close' agitation of farmers by bullock carts on the Indapur toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.