"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 11:50 AM2024-03-24T11:50:16+5:302024-03-24T11:50:30+5:30

पुणेकरांना युववाणी, हॅलो आपली आवड, नभोनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, कौटुंबिक श्रुतिका, असे कार्यक्रम पुन्हा ऐकण्यास मिळणार

"Today's Top News", Akashvani Pune Center will start again, Pune people's fight is finally successful | "आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश

"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश

पुणे: दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आता ७ एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणीच्या वरिष्ठ पातळीवरून नुकतीच यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे, यासाठी पुणेकर लढत होते.

आकाशवाणीचे पुणे केंद्र १९५३ सालापासून सुरू आहे. प्रसार भारतीच्या अधिकृत आकडेवारीनुसार पुणे हे देशातील आकाशवाणीचे सर्वाधिक श्रोते असलेले शहर आहे. तसेच आकाशवाणीचे पुणे केंद्र हे आकाशवाणीचे जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे केंद्र आहे. असे असूनही प्रसार भारतीच्या एका धोरणात्मक निर्णयामुळे दोन वर्षांपूर्वी पुण्यासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांची सायंकाळची प्रसारण निर्मिती बंद करून त्याऐवजी त्यांना मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्याचे आदेश दिले होते.

आकाशवाणीच्या स्थानिक कार्यक्रमांची निर्मिती कमी केल्यामुळे स्थानिक कलाकार, विचारवंत, तसेच आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक यांना मिळणाऱ्या संधी कमी झाल्या होत्या. त्या निर्णयाला आकाशवाणीच्या श्रोत्यांनी आणि स्थानिक कलाकारांनी विरोध केला होता. पुणे केंद्रातील अधिकाऱ्यांकडूनही स्थानिक श्रोते आणि कलाकारांच्या भावना वेळोवेळी वरिष्ठांना कळविल्या जात होत्या. अखेर या प्रयत्नांना यश मिळून ७ एप्रिलपासून आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे प्रसारण पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला वरिष्ठांनी परवानगी दिली. यामुळे आता पुण्यातील श्रोत्यांना त्यांच्या आवडीचे युववाणी, हॅलो आपली आवड, नभोनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, कौटुंबिक श्रुतिका, इत्यादी सायंकाळचे स्थानिक कार्यक्रम पुन्हा ऐकण्यास मिळणार आहेत.

आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यास अनुमती मिळाली असून त्यानुसार ७ एप्रिलपासून आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आम्ही सुरू करणार आहोत. - इंद्रजित बागल, केंद्र संचालक, आकाशवाणी आणि दूरदर्शन, पुणे

Web Title: "Today's Top News", Akashvani Pune Center will start again, Pune people's fight is finally successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.