मॉर्निग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना डंपरने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 15:12 IST2019-05-15T15:11:07+5:302019-05-15T15:12:45+5:30
मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या तीन महिलांना पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उदापूर (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली.

मॉर्निग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना डंपरने चिरडले
पुणे : मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या तीन महिलांना पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी सहाच्या सुमारास उदापूर (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली.मीराबाई सुदाम ढमाले (वय ६८) कमलाबाई महादू ढमाले (वय ६५ ) व सगुणाबाई बबन गायकर (वय ६५ ) अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती असी की, मीराबाई, कमलाबाई आणि सगुणाबाई या दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी नगर-कल्याण महामार्गावर जातात. नेहमीप्रमाणे तिघीही आज एकत्रपणे मॉर्निँगवॉकसाठी सकाळी सहाच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर रस्त्याच्या कडेने निघाल्या होत्या. त्याचवेळी नगरकडून कल्याणकडे भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने त्या तिघींना चाकाखाली चिरडले. तिघीच्याही अंगावर डंपर गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. डंपर चालक न थांबता डंपरसह पळून गेला. सकाळी दूध घेऊन जाणाऱ्या गवळ्यांना त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
ओतूर पोलिसांनी तात्काळ वाहनाचा तपासाठी पथक कल्याण मार्गाकडे रवाना केले. या मार्गावरील बनकरफाटा येथे सीसीटीव्ही कँमेरे आहेत ते तपासले मात्र त्या सीसीटीव्हीत वाहनांचे नंबर दिसले नाहीत. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी या मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यात ही खबर दिली. दरम्यान ठाणे येथील शहापूर पोलिसांनी हा संशीयत डंपर पकडला असून चालकाची चौकशी सुरु आहे.