Pune | पन्नास लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील तीन ठेकेदारांचे पुण्यातून अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 13:30 IST2023-01-14T13:29:34+5:302023-01-14T13:30:22+5:30
अपहरणामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही...

Pune | पन्नास लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील तीन ठेकेदारांचे पुण्यातून अपहरण
पुणे : भरदिवसा मार्केटयार्ड परिसरातून पन्नास लाखांच्या खंडणीसाठी गुरुवारी (दि. १२) मुंबईतील तीन ठेकेदारांचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ सूत्रे हलवीत पाच पथकांनी नगर पोलिसांच्या मदतीने काही तासांतच श्रीगोंदा येथून तिघांना ताब्यात घेतले. मात्र, अपहरणामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने (रा. तिघेही. नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर, त्यांचे इतर साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत एका अपह्रत व्यक्तीच्या भावाने फिर्याद दिली आहे.
अपहरण झालेल्या व्यक्तीमधील एकजण फिर्यादीचा भाऊ आहे. ते मूळचे मुंबई साकीनाका येथील राहणारे आहेत. तेथील एका कंपनीत ते प्रतिनिधी म्हणून काम करतात, तर इतर दोन व्यक्तींमध्ये एक नातेवाईक तर तिसरा त्यांचा मित्र आहे. कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्यात आल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारी ते मार्केटयार्ड परिसरात आले असताना, बारा वाजताच्या सुमारास दोन चारचाकी गाडीतून त्यांचे वास्तूश्री कॉम्पलेक्स समोरून तिघांचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरणकत्यार्पैकी एकाने व्हॉट्सॲपद्वारे व्हिडीओ कॉल करून कंपनी प्रतिनिधी असणाऱ्या प्रमुख अपह्रत व्यक्तीच्या भावाला फोन करून तिघांचे अपहरण केल्याची माहिती दिली. तसेच त्यांना मारहाण करत असल्याचेदेखील दाखवले. त्यानंतर तिघांना सोडवायचे असल्यास पुण्यातील एम. जी. रस्ता येथील एका अंगडीयाकडे ५० लाख रुपये खंडणी देण्याची मागणी आरोपींनी केली.
त्यानंतर फिर्यादी शुक्रवारी (दि. १३) सकाळी मार्केटयार्ड पोलिसांना याची माहिती दिली. अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. प्रत्येकाला विभागून काम देण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून आरोपींचा माग काढण्यास सुरवात केली. आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने नगर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून श्रीगोंदा येथील एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या ताब्यातून एक फॉर्च्युनर आणि एक क्रेटा अशा दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.