पुणे : पुणे जिल्हा अभिलेख कार्यालयाच्या हवेली तालुका उपअधीक्षक कार्यालयातील कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत पुणे जिल्हा अभिलेख कार्यालयाच्या गेल्या साडेतीन वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पैसे घेतल्याशिवाय कामे न करणे, मोजण्यांमध्ये अनियमितता तसेच मोजण्यांच्या तारखांमध्ये परस्पर बदल करणे, अपिलांचे निकाल फिरवणे, उपअधीक्षकांच्या चौकशी करण्यात टाळाटाळ करणे, नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे, नागरिकांशी अरेरावीच्या भाषेत बोलणे, कामात अनियमितता आदी पुणे जिल्हा अभिलेख कार्यालय आणि हवेली तालुका उपअधीक्षक कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांनी थेट तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार याची गंभीर दखल घेत सरकारने समिती तयार करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
चौकशी समितीत काेण?
पुणे जिल्हा अभिलेख कार्यालय आणि हवेली तालुका उपअधीक्षक कार्यालयाच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी पथकामध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक संजय कुंभार, वरिष्ठ लिपिक राजू रोकडे, चांदवड मुख्यालयातील उप अधीक्षक सचिन एकबोटे, सहायक दयानंद जोशी, संभाजीनगरचे नगर भूमापन अधिकारी समीर दाणेकर आणि नाशिक येथील विशेष उपअधीक्षक प्रशांत भोंडे आदींचा समावेश आहे.
पुणे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय तसेच हवेली उपअधीक्षक कार्यालयातील कारभाराबाबत अनेक नागरिकांनी थेट राज्य शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. गेल्या साडेतीन वर्षात या कार्यालयाने केलेल्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यामधील अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला टार्गेट न करता नि:पक्षपणे चौकशी करण्यात येईल. - सरिता नरके, अपर जमाबंदी आयुक्त