Pune | नकार दिल्याने तरुणीचे अपहरण करून लग्न करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:28 IST2023-02-20T17:27:47+5:302023-02-20T17:28:30+5:30
बालाजीनगर येथील एका २२ वर्षांच्या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

Pune | नकार दिल्याने तरुणीचे अपहरण करून लग्न करण्याची धमकी
पुणे : त्याचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, त्याच्या रागीट स्वभावामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले, तेव्हा त्याने तिचे जबरदस्तीने अपहरण करून आपल्यासोबत लग्न केले नाही तर मारून टाकेल, अशी धमकी देऊन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बालाजीनगर येथील एका २२ वर्षांच्या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सोमनाथ सुनील सूळ (वय २५) आणि गणेश बापूराव महानवर (वय ३०, दोघेही रा. केसनंद फाटा, वाघोली) यांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री पावणे दहा ते रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान स्वारगेट येथील जेधे चौक ते वाघोली, जेजुरी व सदाशिव पेठेत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी सोमनाथ हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे असून, एकाच गावातील आहेत. पूर्वी दोघांत प्रेमसंबंध होते. मात्र, सोमनाथ याच्या स्वभावावरून दोघांचे पटले नाही. त्यांच्यात सतत वाद होत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले. दरम्यानच्या कालावधीत तरुणीचे लग्न झाले. मात्र काही दिवसानंतर तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती वेगळी राहत होती. त्यामुळे सोमनाथ याने तिच्याशी पुन्हा संपर्क करत होता. ही तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी गेल्याने ती त्याला भेटायला तयार झाली. त्याने शनिवारी रात्री जेधे चौकात भेटायला बोलवले. त्याप्रमाणे फिर्यादी गेल्या असताना त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तेथून तो तिला वाघोली, जेजुरी येथे घेऊन गेला.
फिर्यादी यांना रात्रभर फिरवले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सदाशिव पेठ येथे आणले. आपल्याबरोबर लग्न केले नाही तर फिर्यादी व तिच्या घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकी देऊन मारहाण केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे तपास करीत आहेत.