महाराष्ट्रात जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अद्दल घडवणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
By नारायण बडगुजर | Updated: May 15, 2023 16:08 IST2023-05-15T16:08:05+5:302023-05-15T16:08:42+5:30
दंगली घडवून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होतोय हे शंभर टक्के जाणून बूजून होतय

महाराष्ट्रात जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अद्दल घडवणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
पिंपरी : राज्यात जाणूनबूजन दंगली घडविण्याचा प्रयत्न होतोय. याला कोणाची तरी फूस आहे. त्यांचा शोध घेऊन सगळं बाहेर आणू, महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी विविध प्रकल्पांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी थेरगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. अकोला येथे दंगल झाली. त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस म्हणाले, दंगली झालेल्या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते. सगळीकडची पोलीस कुमक तिकडे पोहचली आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनांवरून असे लक्षात आले की अशा प्रकारे काही लोक राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार. दंगली घडवून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. हे शंभर टक्के जाणून बूजून होत आहे. याला कोणाचीतरी फूस आहे. पण ते सफल होणार नाहीत. अशाप्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.
काही जणांकडून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न
दंगली घडवून आणण्यामागे कोणाचा हात आहे का, असे विचारले असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशा प्रकारांमागे काही जण नक्की आहेत. त्यात काही संस्था आहेत. काही लोक आहेत. जे लोक मागून अशा प्रकारांना आग लावण्याचा तसेच या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांचे प्रयत्न हाणून पाडून सगळं बाहेर आणू.