यंदा उन्हाचा चटका अधिक जाणवणार; फेब्रुवारीमध्येच तापमानाची पस्तीशी पार
By श्रीकिशन काळे | Updated: February 20, 2025 16:23 IST2025-02-20T16:23:05+5:302025-02-20T16:23:59+5:30
यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

यंदा उन्हाचा चटका अधिक जाणवणार; फेब्रुवारीमध्येच तापमानाची पस्तीशी पार
पुणे : सध्या पुणे शहरात दुपारचे तापमान चांगलेच तापू लागले असून, पुणेकरांना त्याचा चटका आताच सहन होत नाही. कमाल तापमान ३५ अंशाच्या वर पोचले असून, सकाळी आणि रात्री मात्र किमान तापमानात घट पहायला मिळत आहे. यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरामध्ये काही भागामध्ये प्रचंड उष्णता जाणवते तर दुसऱ्या भागात कमी असते. त्यामुळे शहरातील तापमानाचे संतुलन बिघडले आहे. शहरातील बांधकामे, वाढलेली वाहने, मोठ-मोठ्या कंपन्यांमधील एसी आदी गोष्टींमुळे उष्णता वाढत आहे. तसेच हवामानातही बदल होत असून, त्यामुळेच जानेवारीमध्ये उष्णता जाणवत होती. आता फेब्रुवारी महिन्यात देखील हवेच्या वरच्या थरामध्ये उच्च दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यात उत्तरेकडून थंड वारे वाहत असून, त्याचा परिणाम म्हणून उष्णता वाढल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये वातावरणातील मध्यम थरातील उच्च दाब तयार होतो. त्यामुळे उष्णता अधिक निर्माण होते. पण तसाच प्रकार आता तयार झाल्याने पुणे तापत आहे. परिणामी यंदा फेब्रुवारीमध्येच विक्रमी उष्णतेची नोंद झाली.
शहराचे तापमान हे शिवाजीनगर भागाचे जे असेल ते समजले जाते. त्यामुळे यंदा जानेवारीत शिवाजीनगरचे तापमान ३० ते ३२ अंशावर, तर फेब्रुवारीत ३४ ते ३५ अंशांच्या वर नोंदवले जात आहे. त्यातही शहरातील वडगावशेरी, कोरेगाव पार्क हा भाग सर्वात अधिक उष्णतेचे होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये या भागात सर्वाधिक तापमानाची नोंद पहायला मिळत आहे.
कोरेगाव पार्क हॉट
शहरातील सर्वात अधिक झाडी असणारा आणि थंड असणारा परिसर म्हणून कोरेगाव पार्कचा नावलौकिक होता. पण गेल्या तीन वर्षांपासून हा नावलौकिक कमी झाला आहे. तर सर्वाधिक हॉट भाग म्हणून कोरेगाव पार्क ठरत आहे.
शिवाजीनगरचे फेब्रुवारीतील तापमान
२०२५ : ३४.४
२०२४ : ३३.५१
२०२३ : ३२.७६
२०२२ : ३२.२
२०२१ : ३२.३
२०२० : ३१.३१
पाच वर्षांत पाच अंशाने वाढ !
गेल्या पाच वर्षांमध्ये शिवाजीनगरचे फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमान हे सातत्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०२० मध्ये शिवाजीनगरचे फेब्रुवारीमधील कमाल तापमान हे ३१ अंशावर होते, तेच आता ३५ अंशांच्या वर गेल्याचे पहायला मिळत आहे.
पुण्यातच नव्हे तर सर्वत्र वातावरणातील उष्णता वाढत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा अधिक चटका देणारा असणार आहे. जानेवारीतच उन्हाळा सुरू झाल्याचे अनुभवायला मिळाले. फेब्रुवारीमध्ये कमाल तापमान वाढत असल्याने हा महिना उष्ण ठरत आहे. -डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
गेल्या काही दिवसांतील किमान तापमान
२० फेब्रुवारी : १४.७
१९ फेब्रुवारी : १४.९
१८ फेब्रुवारी : १५.१
१७ फेब्रुवारी : १२.९
१६ फेब्रुवारी : १२.८
१५ फेब्रुवारी : १३.४