यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:10 AM2023-10-25T10:10:51+5:302023-10-25T10:11:35+5:30

कर्मयोगी सहकारीच्या ३४ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न ...

This year, nine lakh metric tons of sugarcane is the target: Harshvardhan Patil | यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील

यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील

इंदापूर  : शारदीय महोत्सवाच्या नवव्या माळेच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला. या वेळी बोलताना यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कारखान्याचे संचालक भूषण प्रकाश काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी वृषाली काळे या उभयतांचे शुभहस्ते सोमवारी विधीवत पुजा संपन्न झाली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, या गाळप हंगामामध्ये आपण नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस कर्मयोगीस देवून सभासदांनी सहकार्य केले तर ते शक्य होणार आहे. ११ टक्क्यापेक्षा जास्तीचा साखर उतारा मिळवण्याच्या दृष्टीने अधिका-यांनी ही नियोजन करावे,अशी सूचना त्यांनी दिली.

तालुक्यात हरितक्रांती, धवलक्रांती घडवणारे लोकनेते कर्मयोगी कै. शंकरराव पाटील यांच्यामुळे इंदापूर तालुक्यात ३० लाख टन ऊस उभा आहे. त्यांनी उभारलेल्या कर्मयोगी परिवारावर तालुक्यातील ८४ गावांचा प्रपंच चालू आहे, असे ते म्हणाले. दि.१ नोव्हेंबरला कार्यक्षेत्रातील ५१ ज्येष्ठ सभासदांचे शुभहस्ते गाळप हंगाम सुरु करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सर्व तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज झाली आहे. यावर्षी ऊसाचा ॲडव्हॉन्स इतरांचे बरोबरीने किंवा काकणभर पुढेच असणार आहे याबाबत सर्वांनी निश्चिंत रहावे. हंगामातील सर्व ऊसबिले वेळेवरच मिळतील याबाबतची हमी आम्ही घेतलेली आहे,असे पाटील म्हणाले.

कारखान्यावरच्या विश्वासामुळे ऊस उत्पादक, वाहतुकदार व कामगारांनी कारखान्याकडे ऐच्छिक ठेवी ठेवलेल्या आहेत. कामगारांची मागील सर्व देणी पूर्ण केलेले आहेत,दिवाळी सणासाठी बोनस ही दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पराग जाधव, छगन भोंगळे, वसंत मोहोळकर, रतन देवकर, हनुमंत जाधव, भूषण काळे, विश्वास देवकाते, राहूल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, हिरालाल पारेकर, प्रदीप पाटील, शांतीलाल शिंदे, निवृत्ती गायकवाड, सतीश व्यवहारे, अशोक कदम, प्रवीण देवकर, माजी उपाध्यक्ष भागवत गटकुळ, माजी संचालक मानसिंग जगताप, सुभाष भोसले, भाऊसाहेब चोरमले, पिंटू काळे, नवनाथ काळे, शेतकरी संघटनेचे निलेश देवकर, अभंग अण्णा, पांडुरंग गलांडे, राघू काटे, कुबेर पवार इत्यादी पदाधिकारी, ऊस वाहतुक कंत्राटदार व सभासद कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

मागील हंगामात खेळते भांडवल कमी पडल्याने ऊसबीले,वाहतुक बीले,कमिशन व कामगारांचे पगार या सर्व गोष्टींना विलंब होत गेला. त्याचा आपणा सर्वांनाच खूप त्रास झाला,असे स्पष्ट करुन त्याबद्दल पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. कारखान्याची भूमिका मांडताना कर्मयोगीने नेहेमीच ऊस उत्पादकांना प्राधान्य दिले आहे. ६.५ साखर उतारा देणारा ४३४ जातीचा ऊस गाळपासाठी कर्मयोगीकडे येतो. जळीत झालेला ऊस वाहतूक करुन कर्मयोगीने गाळला आहे. इतर कारखान्यांनी तसे केल्याचे उदाहरण दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्षणिक स्वार्थ साधण्यासाठी चांगल्या चाललेल्या संस्थांच्या शक्तीस्थळावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले जातात. कर्मयोगीबद्दल ही तसेच अनुभव येत आहेत. तालुक्याचा शेतकरी हा कर्मयोगी परिवाराच्या नाळेशी जुडलेला आहे, तो क्षणिक भूलथापांना बळी पडत नाही हे मला ही माहिती आहे.

- हर्षवर्धन पाटील

Web Title: This year, nine lakh metric tons of sugarcane is the target: Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.