"हा सत्कार माझ्यासाठी भारतभूमीचा"; अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदारांच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:36 IST2023-02-22T18:33:41+5:302023-02-22T18:36:17+5:30
आज माझे वय ६८ असून पुढील बावीस वर्षांचे जीवनाचे लेखी नियोजन आपले तयार असल्याचे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी म्हटले...

"हा सत्कार माझ्यासाठी भारतभूमीचा"; अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदारांच्या भावना
पिंपरी : पराभवाची भीती न बाळगता सतत धोका पत्करणे हीच जीवन पद्धती आपण स्वीकारली आहे. बुद्धिमत्ता आणि शिक्षणपद्धती या दोन बाबींवर महासत्ता बनलेला अमेरिकेतील मी खासदार असलो तरी येथे झालेला माझा सत्कार म्हणजे भारतभूमीचा सत्कार मी समजतो. आज माझे वय ६८ असून पुढील बावीस वर्षांचे जीवनाचे लेखी नियोजन आपले तयार असल्याचे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी म्हटले.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या वतीने जागतिक मराठी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, कोषाध्यक्ष उदयदादा लाड, रामदास फुटाणे, कुलपती पी. डी. पाटील, श्रीनिवास ठाणेदार, शास्त्रज्ञ डॉ. मकरंद जावडेकर, डॉ. स्मिता जाधव, सचिन इटकर, कल्याण तावरे आदी उपस्थित होते.
ठाणेदार म्हणाले, महात्मा गांधीना आदर्श मानणारे डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव असून समाजाप्रती उत्तर्दायित्व असणे व सामाजिक कार्यातून जनतेची परतफेड करणे हीच समाजाची सेवा असल्याचे आपण मानतो. प्रशासन आणि राजकारणी हे लोकशाही रचनेमध्ये बदल घडविणारे दोन मोठे स्तंभ असून ध्येय ठेवणे व सातत्याने प्रयत्न करणे हेच आपल्या अमेरिकेत यशस्वी उद्योजक होण्याचे व खासदार होण्याचे श्रेय आहे. अमेरिकेत सुमारे ३० टक्के नागरिक गरिबीत जीवन जगत असले तरी आपण निवडून देणारा लोकप्रतिनिधी योग्य आहे की,अयोग्य आहे? याची पारख अमेरिकन नागरिकांना आहे.
कुठलेही काम करताना खचून जाऊ नका. स्वतः वरचा विश्वास तर बिलकुल गमावता कामा नये. ध्येय ,उद्दिष्ट हे निश्चित करा व सातत्याने सकारात्मक प्रयत्न करत ते गाठण्याचा प्रयत्न ठेवा . मार्ग अपोआप खुला होत जाईल. असे त्यांनी म्हटले.