पुणे : वरातीमागे घोडं, अशी काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. ईव्हीएमसंदर्भात कोर्टात जाण्यासाठी आपण यापूर्वी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोणीही आमच्यासोबत आले नाही. न्यायालय हे एकमेव व्यासपीठ आहे, जिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होते. आता बोंबलत बसण्याऐवजी त्यावेळीच पाऊल उचलणे गरजेचे होते, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. सामान्य माणसाला फसवू नका. जिथे लढायचे तिथे लढायचे नाही, अशी या आघाडीची स्थिती आहे. पाकिस्तानला पाच तुकड्यांमध्ये विभागण्याची संधी असताना काँग्रेसने युद्ध थांबवले, आज तीच भूमिका काँग्रेसने घेतली, तुम्ही युद्ध का थांबवले ते सांगा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांच्याकडे कोण येतो, कोण जाते याची नोंद ठेवली जाते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दोघांना घेऊन गेले, त्यांची एन्ट्री राहुल गांधींच्या घरी असणार आहे. शरद पवारांसोबत दोन माणसे कोण होती, त्यांची नावे जाहीर करू शकता, सामान्य माणसाला फसवू शकता. हा दावा मी खोटे म्हणणार नाही, अशी लोकं मार्केटमध्ये आहेत. मी २००४ पासून बोलतोय ईव्हीएम मेनूप्लेट होतेय, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
...तर इंडिया आघाडीने न्यायालयीन लढाईत सोबत यावे
‘इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे. काँग्रेस पक्षात एकमत दिसत नाही, वेगवेगळे गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी आपण पत्र लिहिले होते. पण, त्यावेळी कोणीच सोबत उभा राहिला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नसाल, तर तुम्ही यात सहभागी होऊ शकता,’ असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीला केले.
एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग
‘केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल’ यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण करणे नाही, तर यामागे राजकीय हेतू आहे,’ असा आरोप करून प्रकाश आंबेडकर म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहे. श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाही, हाच या यात्रेमागचा राजकीय हेतू आहे. मागील निवडणुकांमध्ये ओबीसी भाजपकडे झुकला यात दुमत नाही, पण आता त्यांच्या लक्षात आले आहे की ‘एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग आहे,’ अशी उपरोधिक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.