Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 21:18 IST2022-03-15T21:18:31+5:302022-03-15T21:18:52+5:30
विविध गुन्हे दाखल असलेल्या गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्काची कारवाई करण्यात आली

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई
पिंपरी : विविध गुन्हे दाखल असलेल्या गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्काची (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९) कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी या टोळीवर मोक्कांतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. तर यापूर्वी या टोळीवर पुण्यात देखील मोक्काची कारवाई झाली आहे.
गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६), नानासाहेब शंकर गायकवाड (दोघेही रा. आयटीआय रोड, औंध), संदीप गोविंद वाळके, सचिन गोवंद वाळके (दोघेही रा. विधाते वस्ती, बाणेर, पुणे), राजू दादा अंकुश (रा. पिंपळे गुरव) आणि ॲड. चंद्रकांत बाबासाहेब नाणेकर (रा. लिंक रोड, बाणेर) अशी मोक्काची कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, असे एकूण १४ गुन्हे आरोपींच्या विरोधात पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून वर्चस्वासाठी तसेच आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.