शिक्रापूर: शिक्रापूर ता. शिरुर येथे सोमवारी रात्री चोरट्यांनी मेडिकल दुकान लक्ष करत एका रात्रीत आठ मेडिकल फोडून प्रत्येक दुकानातून रोख रक्कम चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मेडिकल टार्गेट केल्याने शिक्रापूर परिसरात मेडिकल दुकानदार धास्तावले असल्याचे दिसते आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे सुमारे ५५ मेडिकल आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास मेडिकल चालक त्यांचे मेडिकल बंद करुन घरी गेले होते. दरम्यान काही मेडिकलचे शटर उचकटून चोरी झाल्याचे लक्षात आले. शिक्रापूर तळेगावरोड येथील रमेश मेडिकल, कल्याणी मेडिकल, मातोश्री मेडिकल, श्री स्वामी समर्थ मेडिकल, मलठण फाटा येथील साई मेडिको, न्यू श्रेया मेडिकल, आराध्या मेडिकल तर हिवरे रोड येथील प्रकाश मेडिकल चोरट्यांनी फोडले. प्रत्येक मेडिकल मधून रोख रक्कम चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, महेंद्र शिंदे, पोलिस हवलदार कृष्णा व्यवहारे आदींनी अंगुली मुद्रा पथकाच्या उपस्थीतीत पंचनाना केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहॆ.