पुणे: स्वारगेट बसस्थानक आणि पीएमपी बसथांबा परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. दोन ज्येष्ठ महिलांच्या ५० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबवल्या. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे दोन्ही घटनांतील आरोपी अजूनही मोकाट असून, स्थानकातील सुरक्षेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
पहिल्या घटनेत आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी या प्रवासाला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक येथे आल्या होत्या. एसटी स्थानकातून सोलापूर बसमध्ये चढताना, गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. बांगडी चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वारगेट पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.दुसरी घटना शनिवारी (दि. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत सदाशिव पेठ येथील ७१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या सारसबाग येथील सणस मैदान बसथांबा येथून घोटावडे जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये चढत असताना, चोरट्याने गर्दीचा गैरफायदा घेत त्यांच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.