गोळीबार करत चोरट्यांनी लुटली ३ लाख ७८ हजारांची रोकड; पुणे-सातारा महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 19:36 IST2023-02-20T19:35:47+5:302023-02-20T19:36:01+5:30
चोरट्यांनी त्यांच्या जवळील पिस्तुलातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला...

गोळीबार करत चोरट्यांनी लुटली ३ लाख ७८ हजारांची रोकड; पुणे-सातारा महामार्गावरील घटना
खेड शिवापूर : रात्री दारू विक्रीचे दुकान बंद करून दिवसभराच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन जात असताना गोळीबार करून कर्मचाऱ्यांकडून ३ लाख ७८ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री खेड-शिवापूर भागात घडली.
प्राप्त माहितीनुसार पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर हद्दीतील सोनल वाइन्स या मद्य विक्रीच्या दुकानातील दोन कर्मचारी दीपक जगदाळे व कालेश्वर अगारिया हे रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास दुकान बंद झाल्यानंतर दिवसभराचा पैशांचा हिशोब करून ३ लाख ७८ हजार रुपये ही रक्कम बरोबर घेऊन मोटारसायकलवरून शेजारील पंपावर जात होते. मोटारसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलला धक्का देत त्यांच्या जवळील रोख रक्कम असलेली बॅग ओढून नेण्याचा प्रयत्न केला. त्यातील कालेश्वर कगारिया या कर्मचाऱ्याने त्यास विरोध केला. चोरट्यांनी त्यांच्या जवळील पिस्तुलातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला व रोकड असलेल्या बॅग ओढून जबरदस्तीने काढून घेऊन चोरट्याने तेथून पोबारा केला.
घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर राजगड पोलिसांच्या वतीने तपासासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. सदर घटनेचा तपास राजगडचे स.पो. निरीक्षक मनोज कुमार नवसरे करत आहेत.