खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ; सात दिवसांत दोन घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 17:23 IST2021-11-15T17:21:56+5:302021-11-15T17:23:04+5:30
शेतकऱ्याचे कृषी पंप, दुचाकी चोरी, मोबाईल चोऱ्या व कंपन्यातील मालाची चोरी अशा चोरीच्या घटना तालुक्यात सतत घडत आहे.

खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ; सात दिवसांत दोन घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास
राजगुरुनगर : खेड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. राजगुरुनगर शहरातील घरफोडीची घटना ताजी असताना चांदुस ( ता खेड ) येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या दोन लाख ९३ हजाराचे सोन्या चांदिचे दागिने लांबविले आहे. याबाबत साधना अंकुश कारले रा. चांदूस ता. खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि १४ रोजी सकाळी १० ते ५ वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला आहे. चांदूस येथे फिर्यादीचे दीर नारायण मोहन कारले यांच्या घरामागील दरवाजाचे कुलुप अज्ञात चोरट्याने तोडले. चोरट्यांनी नारायण कारले यांच्या घरात प्रवेश करुन घराच्या आतील भिंतीवरून फिर्यादी साधना कारले यांच्या घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा व आतील लॉकर उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ६३ हजार रुपायांचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांची रोख रक्कम असा दोन लाख ९३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. आठ दिवसापूर्वी राजगुरूनगर शहरातील स्वप्नील शिवाजी चौधरी यांच्या फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोंयडा तोडून फ्लॅटमधील सुमारे ४ लाख ६७ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. तसेच दोन दिवसापूर्वी राजगुरुनगर येथे इंदु विलास सातकर या जेष्ठ महिलेची दोन भामट्यांनी दिशाभुल करून ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तसेच शेतकऱ्याचे कृषी पंप, दुचाकी चोरी, मोबाईल चोऱ्या व कंपन्यातील मालाची चोरी अशा चोरीच्या घटना तालुक्यात सतत घडत आहे.