पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. ५१ तोळे सोनं, आलिशान फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि धुमधडाक्यात लग्न लावून दिल्यानंतरही वैष्णवी हगवणेचा सासरी छळ सुरू होता. सासरा, सासू, पती, दीर, नणंद सगळेच वैष्णवीचा छळ करायचे. इतकंच नाही तर तिला मारहाणही करायचे. अर्थात हे सर्व वैष्णवीच्या व्हॉट्सॲप चॅटिंगमधून समोर आलंय. वैष्णवीने मैत्रिणी सोबत केलेल्या चॅटिंगमध्ये या सगळ्यांचा उल्लेख केलाय. त्यामुळे हगवणे फॅमिली किती क्रूर होती. हे आता सर्वांच्या समोर आलंय.
वैष्णवी सासरी असताना त्यांच्या मोठ्या सुनेने कुटुंबाकडून मारहाण, छळ होणारी तक्रार सहा महिन्यापूर्वी बावधान पोलीस व महिला आयोगाकडे केली होती. पण महिला आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे. राजेंद्र हगवणे च्या मोठ्या सुनेने त्यांना सुद्धा कुटुंबाकडून मारहाण, छळ होणारी तक्रार सहा महिन्यापूर्वी बावधान पोलीस व महिला आयोगाकडे केली होती. महिला आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्याच वेळेस हगवणे कुटुंबावर कारवाई झाली असती तर आज वैष्णवी हगवणे वाचल्या असत्या. बेजबाबदार महिला आयोग तिने दिलेली तक्रार जर जबाबदारीने हाताळत नसतील तर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली आहे.
पीडितेने मदत न घेता टोकाचे पाऊल उचलले - चाकणकर
पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे या महिलेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी माध्यमांद्वारे समोर आली आहे. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने बावधन पोलिसांना तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत पीडित महिलेची सासू, नवरा नणंद यांना अटक करण्यात आली असून फरार असलेले दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध पोलिस घेत आहेत. यापूर्वीही महिला आयोग कार्यालयास याच कुटुंबातील एका महिलेने तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशन येथे नियमानुसार कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते व त्याप्रमाणे पोलीस स्टेशन यांनीही कार्यवाही केली होती. दुर्दैवाने या पीडितेने मदत न घेता टोकाचे पाऊल उचलले. मृत वैष्णवी हिला न्याय मिळेल यासाठी आयोग पाठपुरावा करेल असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.