तेव्हा शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली..! छगन भुजबळ यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:41 IST2025-02-01T15:39:54+5:302025-02-01T15:41:32+5:30

चौकशीमध्ये माझ्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. असेही भुजबळ म्हणाले.

Then Sharad Pawar rushed to accept my resignation Chhagan Bhujbal allegation | तेव्हा शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली..! छगन भुजबळ यांचा आरोप

तेव्हा शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली..! छगन भुजबळ यांचा आरोप

पुणे : ‘तेलगी प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. मात्र, त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केला. ओबीसींसाठी दाेन वेळा मुख्यमंत्रिपद साेडले, अन्यथा तेव्हाच मुख्यमंत्री झालाे असताे, असेही ते म्हणाले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २रा संसद कट्टा अंतर्गत शुक्रवारी सकाळी भुजबळ यांची विशेष मुलाखत झाली. ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी भुजबळ यांना विविध विषयांवर बोलते केले. या प्रसंगी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूल जाधवर उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतर पुढे अनेक वर्षे ते कायम तळ्यातमळ्यात भूमिका घेत होते. मला ते पटत नव्हते, अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या भाजपसोबत आहोत, मात्र त्यांच्याबरोबर लग्न केलेले नाही, अशी टिप्पणीही भुजबळ यांनी केली.



...तर त्याचवेळी मुख्यमंत्री झालो असतो

महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला हाेता. त्यावर आम्ही पेटून उठलाे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पहिला शाखा प्रमुख झालाे. पुढे मुंबईचा महापाैर, आमदार आणि मंत्री, उपमुख्यमंत्रिपददेखील भूषविले. मंडल आयोगाला पाठिंबा देण्यावरून मतभेद झाला आणि मी बाळासाहेब ठाकरे यांना साेडून काँग्रेसमध्ये गेलाे. तेव्हा बाळासाहेब म्हणायचे की, माझा भुजबळ शरद पवारांनी घेऊन गेला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी मुख्यमंत्री झालो असतो. शरद पवार यांच्यासोबत न जाता काॅंग्रेसमध्येच राहिलाे असताे, तरीही मुख्यमंत्री झालाे असताे. तेव्हा तशी हमी सुद्धा दिली गेली हाेती. ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर, ओबीसी समाजाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत,’ असेही भुजबळ म्हणाले.

‘राज्यपाल होणार नाही’
राज्यपाल हे पद मोठे आणि मानाचे आहे, त्या पदाचा मला अवमान करायचा नाही, मात्र त्या पदावर राहून सर्वसामान्यांसाठी मी बोलू शकणार नाही. मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मी ते पद स्वीकारणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

माझा कुणालाही वापर करू देणार नाही

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्याने मराठा समाजाच्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा फटका बसला आणि विधानसभा निवडणुकीत माझे मताधिक्य कमी झाले. मात्र, त्यानंतरही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत आहे. जरांगे यांच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला, असे अनेकांना वाटते. मात्र माझा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी तो करून देणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.

‘जाे दुसऱ्यासाठी मेला ताे कायम जगला’

सत्तेत नाही, तरीही चर्चेत आहात, हे कसे? या पहिल्याच प्रश्नावर भुजबळ यांनी राज्यात आतापर्यंत किती मुख्यमंत्री झाले, हे समोरची मुले सांगू शकतील का? असा प्रतिप्रश्न केला. ‘जाे दुसऱ्यासाठी मेला ताे कायम जगला’ असे स्पष्ट करत डॉ. बाबा आढाव, डाॅ. जाधवर यांच्यासह अनेकांचा दाखला देत समाजासाठी, एका विषयासाठी वाहून घेतलं पाहिजे. अशा वेळी सत्तेत आहात की नाही, याला काही अर्थ राहत नाही, असेही भुजबळ म्हणाले.

भाजपसोबत लग्न केलेले नाही 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सन २०१४मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. पुढे अनेक वर्षे ते यासंदर्भात तळ्यातमळ्यात भूमिका घेत होते. मला ते पटत नव्हते. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या भाजपसोबत आहोत. पण, भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Web Title: Then Sharad Pawar rushed to accept my resignation Chhagan Bhujbal allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.