इंद्रायणी घाटाचे काम अचानक उखडण्यात आले; रात्रीत नियोजन करून तोडले गेले, कराड यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:27 IST2025-05-15T13:26:51+5:302025-05-15T13:27:13+5:30
रात्रीत नियोजन करून तोडले गेले हे दुर्दैवी आहे, यात राजकारण झाले असून, स्वकीय लोकच कट-कारस्थान करून घाट तोडत आहेत

इंद्रायणी घाटाचे काम अचानक उखडण्यात आले; रात्रीत नियोजन करून तोडले गेले, कराड यांची खंत
पुणे : जगाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या श्री क्षेत्र आळंदी येथे १९८८ मध्ये केलेले इंद्रायणी घाटाचे काम अचानक उखडण्यात आले. रात्रीत नियोजन करून तोडले गेले, हे दुर्दैवी आहे. यात राजकारण झाले असून, स्वकीय लोकच कट-कारस्थान करून घाट तोडत आहेत, अशी खंत श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वत: लक्ष घालून ताेडगा काढावा, अशी विनंती पत्रव्यवहाराद्वारे केली असून, त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंती आम्ही करीत आहाेत, असेही ते म्हणाले.
काेथरूड येथील कॅम्पसमध्ये बुधवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त डॉ. स्वाती कराड-चाटे, यशोधन महाराज साखरे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एम. पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये आणि माईर्सचे संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी येथे आले होते, तेव्हाही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र भेटीची वेळ मिळाली नाही. त्या संदर्भातील पत्रालाही उत्तर मिळाले नाही. घाटावरील कामाच्या छेडछाडीबाबत आम्ही स्थानिक प्रशासनाला विचारले असता शासनाच्या आदेशावरून काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. आम्ही यापूर्वीच केलेली सांडपाण्याची वाहिनी असतानाही नवीन वाहिनी टाकण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. किमान आम्ही ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर तरी काम थांबवणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही.
साखरे महाराज म्हणाले, इंद्रायणी नदीवर घाट बांधत असताना कॉलम आणि बीम टाकण्यात आलेले आहेत, ज्यामुळे घाट अधिक मजबूत झाला. पाइपलाइनसाठी घाट तोडताना बीमला काही धक्का पोहोचला आहे का? हे देखील बघावे लागणार आहे. सध्या त्याठिकाणी केवळ काँक्रिट टाकण्यात आलेले आहे. घाट तोडण्याच्या अगोदर डॉ. कराड यांना किमान विचारले असते तर घाटाचा आराखडा दाखवता आला असता. परंतु, प्रशासनाकडून तेवढी काळजी घेतली गेली नाही.