Pune: इंटिरीअर डिझाईनर महिलेने डिस्काऊंटचे आमिष दाखवून केली ७ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:20 IST2022-04-04T15:20:37+5:302022-04-04T15:20:48+5:30
पैशांबाबत विचारणा केल्यावर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली

Pune: इंटिरीअर डिझाईनर महिलेने डिस्काऊंटचे आमिष दाखवून केली ७ लाखांची फसवणूक
पुणे : बंगल्यातील फर्निचरसाठी काम दिले असताना नवीन वातानुकुलीन यंत्रणेच्या खरेदीत डिस्काऊंट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इंटिरीअर डिझायनर महिलेने ६ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली. पैशांबाबत विचारणा केल्यावर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शोनी सिद्धार्थ विर्दी (वय ४४, रा. रोहन मिथिला, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पूर्वी रवीशंकर शुक्ला (वय २२, रा. सेंलेट, मगरपट्टा, मुळ छिंदवाडा) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ नोव्हेबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला.
शोनी विर्दी यांना त्यांचे फ्लॅटचे इंटिरीअर डिझाईन व फर्निचरचे काम करुन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी जस्ट डायलवरुन माहिती घेतली. त्यांना पूर्वी शुक्ला यांचा नंबर मिळाला. त्यांनी पूर्वी यांच्याशी संपर्क साधला. तिने फिर्यादी यांना वेगवेगळे डिझाईनचे फोटो पाठवले. फर्निचरसाठी त्यांच्याकडून पैसे घेतले. फिर्यादी यांच्या घराच्या फर्निचरचे अर्धवट काम केले. घरासाठी नवीन वातानुकुलीन यंत्रणेवर डिस्काऊंट मिळत असल्याचे सांगितले. तसेच सोफ्यावरील कापड खरेदी करण्याचे असल्याचे सांगून त्यांच्याकडून ६ लाख ९५ हजार रुपये घेतले. मात्र, काम अर्धवट ठेवले. याबाबत फिर्यादी यांनी फोन करुन विचारणा केली. तेव्हा तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विर्दी यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.