Swargate Rape Case: 'तिला या गोष्टींचा त्रास होतोय, ती रडतेय', 'त्या' पीडित तरुणीचा वसंत मोरेंना कॉल; काय झालं बोलणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:35 IST2025-03-03T16:34:15+5:302025-03-03T16:35:44+5:30
स्वारगेट बलात्कार प्रकरण : पुण्यातील बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने शिवसेनेचे (यूबीटी) वसंत मोरे यांना कॉल केला होता. दोघांमध्ये काय चर्चा झाली?

Swargate Rape Case: 'तिला या गोष्टींचा त्रास होतोय, ती रडतेय', 'त्या' पीडित तरुणीचा वसंत मोरेंना कॉल; काय झालं बोलणं?
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पीडित मुलीवरही आरोप होताहेत. तरुणीच्या सहमतीने दोघांमध्ये शरीरसंबंध झाल्याचे आरोपीचा वकील, त्याची पत्नीने म्हटले आहे. तर पैसे न दिल्याने वाद होऊन तरुणीने तक्रार दिल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना पीडित तरुणीने शिवसेनेचे (यूबीटी) राज्य संघटक वसंत मोरे यांना कॉल केला. दोघांमध्ये काय बोलणे झाले, याबद्दल वसंत मोरेंनी माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यात वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "प्रकरण घडलं, त्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा कॉल आला. ती मुलगी माझ्याशी फोनवर बोलली. ती प्रचंड रडत होती."
तरुणीशी फोनवरून बोलणं झालं, त्याच्या एकदिवस आधीच मला असीद सरोदे यांचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं होतं की, या विषयात काही मदत हवी असेल, तर मला सांगा, असे ते म्हणाल्याचेही वसंत मोरे यांनी म्हणाले.
साडेसात हजार घेतल्याचा आरोप
"२० मिनिटं मी त्या मुलीशी बोललो. प्रचंड रडत होती. कालपण आम्ही तिच्यासोबत बसलो होतो. ती सुशिक्षित तरुणी आहे. तिच्यावर ज्या पद्धतीने साडेसात हजार घेतल्याचा आरोप होत आहे. आज त्या सगळ्या गोष्टी 'दूध का दूध और पानी का पानी' झाल्या आहे", असे वसंत मोरे बोलताना म्हणाले.
त्याची बायको कुणाची भाषा बोलत आहे?
"मी त्यादिवशी सुद्धा बोललो होतो की, त्या भिकारी माणसाकडे झोपायला जागा नव्हती. तो बसस्थानकावर झोपायचा. तो ७००० रुपये कुठून देणार तिला? ज्यावेळी त्या गोष्टी इकडे सांगण्यात आल्या, त्या सगळ्या खोट्या ठरल्या आहेत. त्याची बायको कुणाची भाषा बोलत आहे? त्याची बायको जे इथे राजकीय नेते म्हणालेत की, तिने आरडाओरडा केला नाही. त्याच्या बायकोच्या तोंडून हेच शब्द कसे आले?", असा सवाल या प्रकरणाबद्दल शंका व्यक्त करणाऱ्यांना वसंत मोरेंनी केला आहे.
"पैसे घेतले, कपडे फाटले नाहीत, या गोष्टींचा तिला भयंकर त्रास होतोय. ती रडतेय. तिने आम्हाला सांगितलं की, घटना एक दिवस घडलीये, पण तिला दररोज तेच विचारलं जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला तिला तेच सांगावं लागतंय. व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्येही तिने तेच सांगितलं आहे. तिचं दुःख बाजूला पडलंय. आरोपी सुखात पडलाय आणि हिला आरोपीसारखी वागणूक मिळतेय. दररोज तिला सांगितलं जातंय की १० वाजता इथे या, ११ वाजता या म्हणून बोलवलं जातंय. बसायला सांगितलं जातंय, असे ती म्हणत होती, असे वसंत मोरेंनी सांगितलं.
7500 रुपयांच्या आरोपाबद्दल वसंत मोरे काय बोलले?
"सात हजार पाचशे रुपये दिले असते... ४८ तास त्या मुलीची बॅग पोलीस ठाण्यात होती. ती ठेवून गेली होती. मग ७५०० रुपयांचा उल्लेख पोलिसांच्या कोणत्याच निवेदनामध्ये का नाहीये? ज्यांनी कोणी इथे येऊन त्या गोष्टी बोलल्या, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यासंदर्भात असीम सरोदेंनी अर्ज दाखल केला आहे", अशी माहिती वसंत मोरेंनी दिली.
उद्धव ठाकरेंची परवानगी घेतलीये...
वसंत मोरे म्हणाले की, "आम्ही यासंदर्भातील गोष्टी कोर्टासमोर मांडल्या आहेत. मी माझ्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली आणि असीम सरोदे यांच्याशी बोललो आणि आज अर्ज दाखल केला आहे. त्यावर उद्या सकाळी सुनावणी आहे", असे माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले.