पुणे : ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियोजित वेळेवर धावण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, रविवारी पुण्याकडे येणाऱ्या अप लाइनवर मालगाडीचा खोळंबा झाल्याने मूर्तिजापूर स्थानकावर वंदे भारत दोन तास थांबविण्यात आली. त्यामुळे नागपूर-पुणे वंदे भारत रविवारी ९ वाजून ५० मिनिटांऐवजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी पुण्यात पोहोचली. नियोजित वेळेपेक्षा पावणेदोन तास उशीर झाला.
एका आठवड्यापूर्वी पुणे ते नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास सोयीचा झाला आहे. ही एक्स्प्रेस नागपूरवरून सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी निघते. पुण्यात रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पोहचते. १२ तासांत वंदे भारत हे अंतर पूर्ण करते. इतर एक्स्प्रेस गाड्या नागपूरवरून पुण्याला पाेहचण्यासाठी १५ ते १६ तासांचा वेळ घेतात. यामुळे या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी नागपूरवरून नियोजित वेळेत वंदे भारत निघाली, परंतु अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर स्थानकाजवळ मालगाडी खोळंबली होती. त्यामुळे वंदे भारत दोन तास एकाच जागी थांबून होती. यामुळे प्रवाशांना दोन तास ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे पुढील स्थानकावर पोहचण्यासाठी वंदे भारतला उशीर झाला.