सचिन सिंग
वारजे : सण रक्षाबंधनाचा असो की आयुष्यातला कोणताही संकटाचा क्षण, बहीण तिच्या भावासाठी सर्वस्व देण्यास तयार असते. सिंहगड रोडवरील विजय देशपांडे यांच्या जीवनात हे शब्द अक्षरशः खरे ठरले.
विजय देशपांडे (वय ५२) हे पुण्यात एका खासगी बँकेत व्यवस्थापकपदी नोकरी करत असताना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन त्यांच्या दोन्ही किडन्या काही वर्षांपूर्वी निकामी झाल्या. उपचारांचा खर्च आणि भावाचे बिघडलेले आरोग्य पाहून कुटुंब हतबल झाले होते. अशा वेळी त्यांची मोठी बहीण अश्विनी बादरायनी (वय ५६) यांनी भावासाठी स्वतःची एक किडनी डोनेट करण्याचा निर्णय घेतला.
दोन बहिणींनंतर विजय हे सर्वांत धाकटे आहेत. त्यांना रक्तदाब झाल्यावर हळूहळू किडन्या निकामी होत गेल्या. काही वर्षांपूर्वी त्यांचे डायलिसिस देखील सुरू झाले. पूर्वी आठवड्याला एक दिवस होणारे डायलिसिस काही महिन्यांनी दिवसाआड होऊ लागले. त्यामुळे विजय हे रात्र रात्र जागत व त्यांना डायलिसिसचा होणारा त्रास सहनच होत नसे. कोरोना काळात हा त्रास अजूनच वाढला. प्रचंड तणावात असलेल्या भावाची ही अवस्था अश्विनीताईंना पाहवली नाही व अखेर त्यांनी स्वतःची एक किडनी डोनेट करायचा निर्णय घेतला. सगळ्या टेस्ट व ब्लड ग्रुप जुळल्यावर जून २०२२मध्ये बाणेर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या काळात त्यांना त्यांच्या कुटुंबानेही खूप सहकार्य करत आधार दिला. आता आश्विनी आणि त्यांचे बंधू विजय दोघेही ठणठणीत आहेत. आश्विनी यांना एक बहीण आहे, त्या सध्या पंढपुरात राहतात त्यांचाही त्यांना खूप मोठा आधार आणि प्रत्येक कार्याला भक्कम पाठिंबा असतो.
नोकरी सोडून कुटुंबाला पूर्ण वेळ
आश्विनी बँकेत नोकरी करत होत्या मात्र किडनी डोनेट करण्याच्या निर्णयानंतर घरच्यांच्या आग्रहाखातर आणि घरच्यांना वाटणाऱ्या त्यांच्या काळजीखातर त्यांनी नोकरी सोडली. नातवांचा सांभाळ करण्यात त्यांना आनंद असून, त्यांनी पुढील आयुष्य भाऊ आणि कुटुंबासाठी आनंदाने जगायचे ठरवले.
अश्विनी यांच्या यजमानांनाही एकच किडनी
अश्विनी यांचे पती यांना २०१५ मध्ये मुतखड्याचा त्रास झाल्यावर त्यांना जन्मत: एकच किडनी असल्याची माहिती त्यांना होती. वयाच्या पन्नाशीनंतर ठणठणीत असल्याने आपणही एका किडनीवर राहू शकतो असा विश्वास अश्विनी यांना वाटला, त्यामुळे त्यांनी भावासाठी किडनी डोनेट करणयाचा निर्णय घेतला. आज अश्विनी पती-पत्नी व त्यांचे भाऊ विजय देशपांडे हे सगळे एका किडनीवर देखील ठणठणीत आरोग्यदायी जीवन जगत आहेत.