पुणे : पुणे महापालिकेचे माजी मनसे नगरसेवक ॲड. किशोर शिंदे हे आयुक्त नवल किशोर राम यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे महापालिकेत गोंधळ निर्माण झाला. त्याने जुन्या घटनांना उजाळा मिळाला असून, महापालिकेत अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या वादांची परंपरा जुनीच असल्याचे समोर आले आहे.
पुणे महापालिकेत १९९७ साली तत्कालीन आयुक्त रमानाथ झा आणि तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष आबा बागुल यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली होती. त्यावेळी रमानाथ झा यांनी स्थायी समितीच्या बैठकांवर बहिष्कार टाकला होता. सप्टेंबर २००६ मध्ये मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन आयुक्त नितीन करीर यांच्या दालनात घुसून सर्व दरवाजे आतून बंद केले आणि तब्बल दोन तास त्यांना घेराव घातला होता. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची लेखी हमी त्यांनी घेतल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले होते. या घटनेनंतर मनसेच्या १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
फेब्रुवारी २०१४ मध्ये भाजपच्या नगरसेवकांनी कचऱ्याच्या प्रश्नावरून महापालिकेत जोरदार आंदोलन केले. तत्कालीन आयुक्त विकास देशमुख यांच्या टेबलावरच कचरा ओतत त्यांनी निषेध व्यक्त केला होता. तत्कालीन भाजप शहराध्यक्ष अनिल शिरोळे आणि अन्य नगरसेवकांनी कचऱ्याचे पोते, बादल्या घेऊन महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.
फेब्रुवारी २०१९ मध्ये माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. पाषाण व कात्रज तलावांतील जलपर्णी प्रकरणावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर दालनात आंदोलन करताना हा प्रकार घडला. त्यानंतर धंगेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.