पुण्यात महायुतीची ताकद वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागातून पदाधिकारी भाजप अन् शिंदे गटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:52 IST2025-12-20T15:51:31+5:302025-12-20T15:52:34+5:30
महायुतीत जोरदार इनकमिंग सुरु झाली असून अजित पवार गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे.

पुण्यात महायुतीची ताकद वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागातून पदाधिकारी भाजप अन् शिंदे गटात
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाजप प्रवेश शनिवारी आज मुंबईत झाले आहेत. त्यात अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीच्या तिकिटासाठी फिल्डिंग सुरू केली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यात ज्या भागात भाजपची ताकद कमी आहे. त्या भागात अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग झाली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे.
विधानसभेत काँग्रेससोबत बंडखोरी करणारे आबा बागुल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, विकास नाना दांगट, सायली वांजळे, रोहिणी चिमटे, नारायण गलांडे, सचिन दोडके यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील बऱ्याच माजी नगरसेवकांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचे सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीची ताकद वाढल्याचे दिसू लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे, पिंपरी दोन्ही महापालिकांमध्ये एकहाती भाजपची सत्ता येणार असल्याचे सांगितले आहे. अशातच महाविकास आघाडी आणि अजित पवार गटातील बरेच पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. तर काही जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आबा बागुल यांनी विधानसभेत काँग्रेससोबत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार त्याठिकाणी पराभूत झाला. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून महायुतीची ताकद वाढवली आहे. तर सुरेंद्र पठारे, विकास नाना दांगट, सायली वांजळे, रोहिणी चिमटे, नारायण गलांडे, सचिन दोडके हे शरद पवार गटाचे पदाधिकारी होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीची ताकद वाढवली आहे. त्यामुळे पुण्यातील पर्वती, सिंहगड रोड, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागात आता महायुतीचे सार्वधिक उमेदवार आहेत.