वाघ्या श्वानासाठी राज्य सरकारने इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी; भूषणसिंह राजे होळकरांची मागणी

By राजू हिंगे | Updated: March 27, 2025 15:15 IST2025-03-27T15:11:48+5:302025-03-27T15:15:31+5:30

महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे, त्यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय

The state government should appoint a committee of historians for the waghya bhushan singh raje holkar demand | वाघ्या श्वानासाठी राज्य सरकारने इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी; भूषणसिंह राजे होळकरांची मागणी

वाघ्या श्वानासाठी राज्य सरकारने इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी; भूषणसिंह राजे होळकरांची मागणी

पुणे : रायगडावरील वाघ्या श्वानाचा विषय हा कोणत्याही एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जातो, हे दुर्दैवी आहे. इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी शासनाने मध्यस्थी करावी. महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे, त्यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय. वाघ्या श्वानाच्या अस्तित्वावर भाष्य करण्यास नकार देतानाच राज्य सरकारने त्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी, अशी मागणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली.

इतिहास अभ्यासकांच्या समितीमध्ये संजय सोनवणी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या अभ्यासकांना समितीत घ्यावे. जेणेकरून ऐतिहासिक सत्य समोर येईल असे सांगुन भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, होळकरांनी रायगडावरील शिव समाधीसाठी मोठा निधी दिला होता. तुकोजी होळकर यांनी शिवस्मारकासाठी योगदान दिले, त्याच्या स्पष्ट नोंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे, वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की, होळकरांनी दिलेल्या निधीवरच वाद घातला जात आहे? संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना आळा घालण्याची गरज आहे. होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. त्यामुळे, होळकर इंग्रजांना घाबरत होते असे वक्तव्य करणाऱ्यांचा इतिहास किती खोल आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. होळकर घराण्याने शिवरायांसाठी दिलेल्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा. तुकोजी होळकर यांच्या स्मरणार्थ रायगडावर फलक लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

राजकीय अजेंडा चालणार नाही

अहिल्याबाई होळकर यांची येत्या ३१ मे रोजी ३०० वी जयंती आहे. या जयंतीला गालबोट लागू नये, अन्यथा तीव्र विरोध होईल. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये .मुख्यमंत्र्यांनी तातडीने सगळ्या संघटनांना समज द्यावी आणि हा वाद योग्य पद्धतीने सोडवावा,असे भूषणसिंह राजे होळकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजीमहाराज आणि अहिल्यादेवी यांच्या कार्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना भेटून भूमिका मांडणार

मुख्यमंत्र्यांना भेटून लवकरच हा संपूर्ण विषय मांडणार आहे. ताराराणीच्या समाधीच्या संवर्धनावर भर द्यावा, औरंगजेबाच्या कबरीपेक्षा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राजकीय हेतूने कोणीही ऐतिहासिक सत्य बदलण्याचा किंवा विकृत करण्याचा प्रयत्न करू नये, असे भूषणसिंह राजे होळकर यांनी सांगितले.

Web Title: The state government should appoint a committee of historians for the waghya bhushan singh raje holkar demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.