एकतानगरीसाठीचा ३०० कोटींचा निधी राज्यसकारने अद्याप दिलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:39 IST2025-07-29T09:39:23+5:302025-07-29T09:39:40+5:30
- पालिकेने प्रस्ताव पाठवून महिन्याचा कालावधी होऊनही दखल घेतली नाही

एकतानगरीसाठीचा ३०० कोटींचा निधी राज्यसकारने अद्याप दिलाच नाही
पुणे : एकतानगर विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती व वस्ती यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागांत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्तांनी राज्य सरकाराच्या नगरविकास विभागाकडे केली आहे. याबाबतचा प्रस्ताव २६ जून रोजी पाठविण्यात आला आहे. पण, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही त्यासाठीचा निधी अद्याप आलेला नाही.
शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे २५ जुलै २०२४ रोजी एकतानगर भागातील अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे येथील सदनिका आणि दुकाने यांचे विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठीचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचबरोबर राज्यसरकारकडे आपत्ती निवारण निधी असतो. १५ व्या वित्त आयोगानुसार एकतानगरी येथे आपत्ती निवारण निधी वापरता येऊ शकतो. त्यानुसार पुणे महापालिकेने या भागासाठी ३०० कोटींचा आपत्ती निवारण निधी दयावा असा प्रस्ताव राज्यसरकारकडे २६ जून २०२५ रोजी पाठविला.
पुणे महापालिका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत आहे. त्याअंतर्गत ११ टप्प्यांपैकी मुठा नदीवर विषयांकीत भागाचा समावेश असलेला वडगांव खुर्द ते राजाराम पूल या भागाचा स्ट्रेच-६ सुमारे ४.१० कि.मी. लांबीचा समावेश आहे. नदी सुधार प्रकल्पाच्या उद्दिष्टापैकी एक उद्दीष्ट पुराच्या पाण्यापासून लगतच्या वस्ती व भागाचे संरक्षण करणे हा देखील आहे. यामध्ये नागरिकांना चालण्यासाठी पाथवे व जॉगिंग ट्रॅक करणे, वृक्ष लावणे, घाट विकसित करणे, नदीला मिळणाऱ्या नाल्यांचा विकसन करणे आदी बाबींचा समावेश आहे. एकतानगर विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती व बस्ती यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागातील मुठा नदी लगतच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी निधी द्यावा, असे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नमूद केले आहे. पण, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन त्यासाठीचा निधी अद्याप आलेला नाही.