आळंदीत वाद्यांचा गजर,रांगोळीच्या पायघड्या; पंढरीहून माउलींची पालखी स्वगृही परतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 20:04 IST2025-07-20T20:04:15+5:302025-07-20T20:04:38+5:30
तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले.

आळंदीत वाद्यांचा गजर,रांगोळीच्या पायघड्या; पंढरीहून माउलींची पालखी स्वगृही परतली
आळंदी : टाळ - मृदंगाचा निनाद...."माउली - तुकारामांचा अखंड जयघोष... विविध वाद्यांचा गजर.... रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा रविवारी (दि. २०) सायंकाळी साडेसहा वाजता हजारो वैष्णवांच्या साक्षीने अलंकापुरीत विसावला. तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले. दरम्यान १७ वर्षांनंतर तुकाराम महाराजांची पालखी रात्री ८ नंतर आळंदीत माउलींच्या दर्शनासाठी दाखल होईल.
माउलींची पालखी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेपरंपरेनुसार चोपदारांकडून "सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी" या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरू असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माउलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचे स्वागत करून माउलींची आरती घेण्यात आली. त्यानंतर नगरपालिका चौक - श्रीविष्णू मंदिर - श्रीराम मंदिर - हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखीने महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणा मंडपात पालखी स्थिरावली.
पालखीतील 'श्रीं'च्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमोर विराजमान करून संस्थांनतर्फे माऊलींची समाज आरती घेण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंग सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानतर्फे 'श्रीं'ना 'पिठलं - भाकरीचा' महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तद्नंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली. संस्थांनतर्फे मानकरी व सेवेकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. रात्री उशिरा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत दाखल होईल. मंदिर प्रदक्षिणा व आरती घेऊन संत तुकाराम महाराजांच्या पादुका 'श्रीं'च्या गाभाऱ्यात दर्शनासाठी नेण्यात येतील.