बालगंधर्वांनी उंचीवर नेलेली संगीत रंगभूमी पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:08 IST2025-07-16T10:07:53+5:302025-07-16T10:08:20+5:30
बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

बालगंधर्वांनी उंचीवर नेलेली संगीत रंगभूमी पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची
पुणे : कोणतीही संस्कृती ही प्रवाही नदीसारखी असते. ती नदी प्रवाहित राहिली तरच ती नित्यनूतन आणि चैतन्यमयी राहते. बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी- पाटील यांना, तर ''कोहिनूर गंधर्व'' पुरस्कार प्रसिद्ध गायक पं. कैवल्यकुमार गुरव यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रभू बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, बालगंधर्व संगीत रसिक एम मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, उमा सुरेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. रुपये एक लाख ११ हजार असे बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचे, तर रुपये ५१ हजार असे ''कोहिनूर गंधर्व'' पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सुरेश साखवळकर यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर अवंती बायस यांना माणिक वर्मा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, बालगंधर्वांनी संगीत नाट्याला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. बालगंधर्वांनी संगीत रंगभूमीवर स्वतः तर प्रेम केलेच; परंतु त्यांनी रसिकांनाही संगीत नाटकांवर प्रेम करायला शिकवले. बालगंधर्व हे संगीत रंगभूमीवरील दैवदुर्लभ व्यक्तिमत्त्व होते. संगीत रंगभूमीचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाज प्रबोधनासाठी देखील त्यांनी केला.
पंडित उल्हास कशाळकर म्हणाले की, पूर्वी शास्त्रीय संगीत केवळ राजे रजवाड्यांमध्येच ऐकले जायचे. ते सर्वसामान्यांसाठी खुले नव्हते. संगीत रंगभूमीच्या माध्यमातून नाट्यगीतांद्वारे शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. संगीत नाट्य रंगभूमीने शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.