निसर्गसंवर्धक म्हणून स्त्रियांच्या योगदानाची दखल उशिरा..!
By श्रीकिशन काळे | Updated: February 23, 2025 15:23 IST2025-02-23T15:22:39+5:302025-02-23T15:23:15+5:30
वन्यजीव संवर्धक भावना मेनन यांना वन्यजीव संवर्धनासाठीचा पहिला 'जंगल बेल्स' पुरस्कार प्रदान

निसर्गसंवर्धक म्हणून स्त्रियांच्या योगदानाची दखल उशिरा..!
पुणे : "निसर्ग संवर्धन क्षेत्रातील स्त्रियांचे योगदान अतिशय महत्त्वाचे व मूलगामी आहे. माझा वन ख्यात्यातील सुमारे २० वर्षांचा अनुभव बघता वनसंवर्धनाची जवळपास ५० टक्के जबाबदारी स्त्रियाच पेलताना दिसतात, पण निसर्ग किंवा वनसंवर्धक म्हणून स्त्रियांच्या योगदानाची दखल समाजाने उशिरा घेतली", या वास्तवाकडे पुण्याचे मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण (आयएफएस) यांनी लक्ष वेधले.
वन्यजीव संवर्धक भावना मेनन यांना वन्यजीव संवर्धन क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठीचा पहिला 'जंगल बेल्स' पुरस्कार एन. आर प्रवीण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संजीवनी समूहाचे संजय देशपांडे, जंगल बेल्सच्या हेमांगी वर्तक आणि भावना मेनन व्यासपीठावर उपस्थित होते. रुपये ५० हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
एन. आर. प्रवीण पुढे म्हणाले, "गेल्या काही वर्षांतील स्त्रियांचा निसर्ग संवर्धन क्षेत्रातील सहभाग उल्लेखनीय स्वरुपाचा आहे. त्या अधिकारपदावर तर आहेतच, पण ज्याला ग्राऊंड वर्क म्हणतात, जी आजवर पुरुषांची मक्तेदारी मानली जात होती त्यात देखील आता स्त्रिया मागे राहिलेल्या नाहीत. आता स्त्रिया जंगल सफारी मध्ये ड्रायव्हिंग, गाईड, नॅचरलीस्ट, रेंजर, सुरक्षा रक्षक अशा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्या संवेदनशीतेने आणि प्रभावी कार्य करताना दिसतात, पर्यटकांशी परिणामकारक संवाद साधतात असे मी म्हणेन. मात्र, त्यांच्या या योगदानाची योग्य ती दखल समाजाने फार विलंबाने घेतली आहे, या पार्श्वभूमीवर भावना मेनन यांना हा पहिला जंगल बेल्स पुरस्कार मिळतो आहे, हे महत्त्वाचे आहे".
भावना मेनन म्हणाल्या, "निसर्ग संवर्धनाचा उद्देश आता प्रत्यक्ष जंगलात व्याघ्रप्रकल्पा जवळ राहणाऱ्या समाजगटांपर्यंत अधिकाधिक पोचण्याचा प्रयत्न असा अपेक्षित आहे. इको टूरिझममुळे या समाजघटकांचे उत्पन्न वाढेल, हे गरजेचे आहे. शहरी भागातील पर्यटकांचे जंगलप्रेम आता जंगल सफारीजच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष जंगलवासींशी संवाद, त्यांना सोबत घेऊन काम हे आता महत्त्वाचे आहे. शहरी पर्यटकांकडून अशा अपेक्षा या आहेत की त्यांनी इथल्या समाज घटकांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यसाठी मनापासून मदत करावी. त्यांनी केलेल्या कला वस्तू विकत घ्याव्यात व त्यांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी. ज्यातून त्यांना आत्मविश्वास आणि सोबत कुणी असल्याची जाणीव होईल."
हेमांगी वर्तक म्हणाल्या, 'वन्यजीव संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार आहे. वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ठ कामगिरी करण्याऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वन संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचे काम लोकांसमोर यावे व इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळावी, अशी हा पुरस्कार सुरु करण्यामागची भावना असल्याचे हेमांगी वर्तक यांनी सांगितले.
सुनील लिमये, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (आयएफएस), नरेश झुरमुरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी (आयएफएस) व अनुज खरे, मानद वन्यजीव वार्डन या त्रिसदस्सीय पुरस्कार निवड समितीने भावना मेनन यांची या पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कारासाठी देशभरातून ३० हून अधिक अधिक अर्ज आले होते.
संजय देशपांडे यांनी पुरस्कार सुरू करण्यामागील भूमिका मांडली. 'निसर्ग संवर्धनासाठी अनेक व्यक्ती एकेकट्या पद्धतीने कार्यरत आहेत. काही समूह पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या कार्याला ग्राऊंडवर्कची जोड असावी, त्यांचे कार्य तेथील समाजघटकांच्या जीवनात थेट सकारात्मक बदल घडवणारे असावे, आणि कार्यात सातत्य असावे, असे काही निकष आम्ही ठरवले होते. मात्र, निसर्ग संवर्धनात स्त्रियांची भूमिका अनन्यसाधारण असल्याने हा पुरस्कार महिलेसाठी असावा, असा निर्णय घेतला', असे ते म्हणाले.
परीक्षक समितीपैकी सुनील लिमये यांनी दृकश्राव्य मनोगत मांडले. हेमांगी वर्तक यांनी मानपत्राचे वाचन केले. मधुलिका तिजारे यांनी सूत्रसंचालन केले.