सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:16 IST2025-07-01T10:16:01+5:302025-07-01T10:16:39+5:30
सराटी येथील पुलावरून संत तुकोबाचा पालखी रथ आणि त्यासोबतचा संपूर्ण लवाजमा पुलावरून सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ.

सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ
बावडा : नीरा भिवरा पडता दृष्टी | स्नान करिता शुद्ध सृष्टी || संत नामदेव महाराजांच्या या अंभागाच्या गजरात नीरा नदीच्या पाण्याने पंढरपूराकडे निघालेल्या संत तुकाराम महारांजाच्या पादुकांना शाहीस्नान सोहळा आज मंगळवार (दि 1 जुलै )नीरा नदीच्या काठावर सकाळी थाटात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यां वर्षी देखील या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक, वारकरी भाविक भक्तांनी नदी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
पुणे जिल्हातील शेवटच्या मुक्कमासाठी पालखी सोहळा नीरा नदी किनारी वसलेल्या सराटी येथे थांबला होता. सकाळी सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निरा शाहीस्नान सराटी ग्रामस्थ आणि पालखी सोहळ्याचे अध्यक्ष, सोहळा प्रमुख, विश्वस्त व पुणे जिल्ह्यातील अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीतून बाहेर काढून नीरा नदीवरील घाटावर आणण्यात आल्या.
या वेळी परिसरात “माऊली तुकोबाच्या ” च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. भक्तीभाव आणि श्रद्धेने भरलेल्या वातावरणात, तुकोबानंच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. स्नानानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना तुळशीहार अर्पण करण्यात आला. यानंतर त्या पादुका पालखी रथात ठेवण्यात आल्या आणि पुढील मुक्कामासाठी म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाली.
या सोहळ्याला अनेक मान्यवर, वारकरी संप्रदायाचे प्रमुख, कीर्तनकार आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर असलेल्या सराटी येथील पुलावरून संत तुकोबाच्या पालखी रथ आणि त्यासोबतचा संपूर्ण लवाजमा पुलाकडे मार्गस्थ झाला. या क्षणांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पुलावर आणि नदीकाठी हजारो वारकऱ्यांनी गर्दी केली होती.
या वेळी नीरा नदी काठावर सोलापूरकरांनी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत केले. अकलूज येथे आज( दि. १ जुलै )चा पालखी सोहळ्याचा मुक्काम तिसऱ्या गोल रिंगणानंतर असणार आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला भक्तिभावाने निरोप दिला. सराटी येथील वारकऱ्यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी आणि श्रद्धावानांनी तुकोबांच्या पालखीचे शाहीस्नान पाहून आपले जीवन धन्य मानले. अनेकांनी या प्रसंगी तीर्थरुप जलाचे दर्शन घेऊन डोक्यावर घेतले. आषाढी वारीचा हा टप्पा अत्यंत भक्तीने भरलेला आणि पवित्र मानला जातो. वारकऱ्यांसाठी हा क्षण म्हणजे जीवनातील अध्यात्मिक शिखरगाठ असल्यासारखा अनुभव असतो. तुकोबांच्या पादुकांचा शाही स्नान सोहळा म्हणजे भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे अद्भुत प्रतीक आहे. वारकरी आता पुढील मुक्कामासाठी अकलूजकडे मार्गस्थ होत आहेत. आषाढी वारीचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुशासन, भक्ती, आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे.
पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर,उपअधीक्षक अविनाश डोईफोडे ,डीवायएसपी मधुकर भटे, डीवायएसपी डॉ सुदर्शन राठोड,जिल्हा विशेष शाखा पी आय प्रवीण मोरे, तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी सचिन खुडे, पीआय सूर्यकांत कोकणे, सुशील पवार,विस्ताराधिकारी अजित घोगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, पी आय महादेव वाघमोडे, बारामती पी आय चंद्रशेखर यादव, बांधकाम उप अभियंता शिवाजी राऊत, डॉ सुरेखा पोळ, डॉ. ज्ञानेश्वर बाहेगव्हाणकर, डॉ, अभिषेक ताटे, डॉ धनश्री हासे, सराटी गावचे उपसरपंच संतोष कोकाटे, सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी, बापूसाहेब कोकाटे, हनुमंत कोकाटे, मनोज जगदाळे,लक्ष्मण महाराज कुरळे, अण्णा कोळी, महादेव कोळी, राम कोळी, लक्ष्मण कोळी, तानाजी कोळी, ग्रामसेवक अर्जुन साळुंखे , गोविंद कोकाटे, यांच्यासह सराटी व परिसरातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला.
सोलापूर जिल्ह्याच्या वतीने खा. धैर्यशील पाटील , सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्याधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, आरोग्य जिल्हाधिकारी संतोष जाधव व इतर अधिकारी वर्ग यांनी जोरदार स्वागत केले.