एकत्रीकरणाचे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
By राजू इनामदार | Updated: May 8, 2025 18:28 IST2025-05-08T18:27:30+5:302025-05-08T18:28:18+5:30
दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. आमच्या पक्षात काही जणांना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर

एकत्रीकरणाचे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
पुणे : ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण झाले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हा निर्णय आमच्या पक्षातील नव्या पिढीने, खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, मी त्या प्रक्रियेत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी (दि. ८) अनौपचारिकपणे झालेल्या चर्चेत सांगितले. एकत्रीकरणावर खुद्द शरद पवार बोलले असल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांची गुरुवारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंबंधीची विधाने केली.
पवार म्हणाले, दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. आमच्या पक्षात काही जणांना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर अजित पवार यांच्याबरोबर जावे, काहींना वाटते जाऊ नये. एकत्र यायचे की नाही याचा निर्णय पक्षातील नव्या पिढीने घ्यायचा आहे. आमच्या खासदार सुप्रिया सुळे यासंदर्भात निर्णय घेतली. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाहेर झालो आहे.
आमची मंडळी विविध पक्षांत विभागली गेली आहेत तरीही विचाराने मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्या दिल्लीतील खासदारांविषयीही बोलले जाते, मात्र आम्ही सगळे एकाच विचारांचे आहोत असे पवार यांनी या चर्चेत स्पष्ट केले. एकत्रीकरणासंबंधी विचारले असता त्यांनी याचा निर्णय नवी पिढी घेईल याचा पुनरुच्चार केला.